Home Top News अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर

अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर

0

मुंबई (Mumbai) :-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्या काळात त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. मी, एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांना फोनवर घटनेची माहिती दिली आहे. त्यांनाही हा धक्का होता. त्यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केले. पुढच्या सर्व गोष्टी कुटुंबाची चर्चा करून ठरवण्यात येतील असं फडणवीसांनी सांगितले.

तसेच माझं सुप्रिया सुळे, पार्थ पवारांशी बोलणे झाले. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहचल्यानंतर त्यांच्या संमतीने सगळे निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत आहे. पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. अजित पवारांचे जाणे हे कधीही भरून न येणारे हे नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणे अतिशय कठीण आहे. इतक्या सोबत, इतक्या जवळून संघर्षातून आम्ही काम केले आहे. त्यामुळे या घटनेवर विश्वास ठेवायला मन तयार नाही असं सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिवरले.