Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 15 ते 30 ऑक्टोबर या 15 दिवसांच्या दरम्यान एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई (Mumbai): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी गेल्या 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालीय. या दरम्यानच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे अनेक प्रकरणे पुढे आले आहे. तर राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधींची मालमत्ता देखील जप्त जप्त करण्यात आली आहे. यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 30 ऑक्टोबर या 15 दिवसांच्या दरम्यान एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
अवघ्या 15 दिवसात 187 कोटींची मालमत्ता जप्त
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. यात विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
पालघरमध्ये चार कोटी 25 लाखांची रोकड जप्त
पालघरमध्ये आज चार कोटी 25 लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. तलासरीतील उधवा तपासणी नाक्यावर तपासा दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात रोकड आणली जात असताना पोलिसांकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. पालघरच्या तलासरी पोलिसांनी ही कारवाई करत रोकड ताब्यात घेऊन पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू केला आहे.
7995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी केली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेबंर ते 29 नोव्हेबंर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार 7995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी 10905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमुळे पक्षांची संख्या वाढताना इच्छुक उमेदवार आणि बंडखोरांची संख्या ही कमालीची वाढली आहे, हेच यातून दिसून येत आहे. आता तिपटीने वाढलेल्या उमेदवारांपैकी बंडखोरांना बसवणे, वोट कापणाऱ्या उमेदवारांना शांत करणे, हे राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांसमोरचा सर्वात मोठा आव्हान राहणार आहे.