Maratha Reservation Manoj Jarange Patil DCM Fadnavis warning
जालना, 29 डिसेंबर – सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत. त्यानिमित्ताने मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील. हा दौरा रद्द होणारच नाही. २० जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे की, त्यांनी आम्हाला मैदाने द्यावीत, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच आंदोलनासाठी परवानगी मिळाली नाही किंवा जर सरकारने आमची वाहने अडवली, तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांच्या दारात बसू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
येत्या २० जानेवारीला सर्व राज्यभरातून मराठा बांधव आपापली गावं सोडणार आणि आरक्षण घेऊनच माघारी येणार, असा निर्धार जरांगे व्यक्त केला आहे. मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणार आहे. परवानगी नाही मिळाली तरी निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणार आहे. खूप ताकतीने समाज एकत्र येणार आहे. मुंबईतील समाजाने एकत्रित यावं. मराठा बांधवांनी घाबरू नये उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदान, छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि बीकेसी येथील मैदानांचा समावेश असणार आहे. मराठा समाजाने गट-तट ठेवू नयेत. सर्वांनी एकत्र यावे, हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या भविष्याचा विषय आहे. मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मैदानांची आवश्यकता भासणार आहे, त्यासाठी सर्वजण तयारी करत आहोत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलनाचा निर्णय रद्द करणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.














