मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरुच आहे. शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकलेल्या १८ जागांवर चर्चाच होणार नाही, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. तर शिवसेनेला २३ जागा देता येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. त्यावरुन ठाकरे गट व काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली आहे. आम्ही गल्लीतील नेत्यांशी नाही तर काँग्रेस हायकमांडशी चर्चा करु, अशी भाषा संजय राऊत यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याबद्दल वापरल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी व्यक्त होत आहे.
संजय राऊत म्हणाले की, जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने एकही जागा जिंकलेली नाही. काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. काँग्रेस आमचा मित्रपक्ष आहे, जिथे त्यांची ताकद आहे, ती जागा त्यांना मिळेल, असेही ते म्हणाले. त्यामुळे जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने २३ जागा लढवल्या तर आम्ही कुठे जाणार?, असा सवाल संजय निरुपम यांनी केला होता. उत्तर मुंबईच्या जागेवरूनही त्यांनी ठाम भूमिका घेतली होती.














