मविआचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, सर्वाधिक जागा कोण लढविणार?

0

मुंबईः मागील काही निवडणुकांमध्ये एकत्रितपणे निवडणुका लढविल्याने मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका सुरु असून त्यात लोकसभेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या ४८ पैकी चाळीस ते बेचाळीस मतदारसंघांबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत होण्याची शक्यता (MVA for Loksabha Election) असून उर्वरित जागांबाबत आगामी काळात चर्चा सुरु राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागा तर काँग्रेसने ८ जागांवर उमेदवार द्यावा, या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे.
अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासूनच तयारी सुरू केलेली असताना आता मविआच्या जागावाटपाबाबत जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. मविआ लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असून त्यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित होत असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढवणार की स्वतंत्र? यावर अद्याप अधिकृत घोषणा आघाडीकडून करण्यात आलेली नाही. मात्र, या पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचे दावे केले जात आहेत. सध्याच्या स्थितीत ठाकरे गटाने युती केलेल्या पक्षांबाबत कुठलेही धोरण स्पष्ट झालेले नसले तरी त्यांच्यासाठी ठाकरे गटानेच जागा सोडाव्या, असा मतप्रवाह काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आहे.