Home Artical Blog नागपूर पोलिस दलात आधुनिक तंत्रज्ञानाची भर, पेट्रोलिंगसाठी ‘सेग-वे स्कूटर’चा वापर

नागपूर पोलिस दलात आधुनिक तंत्रज्ञानाची भर, पेट्रोलिंगसाठी ‘सेग-वे स्कूटर’चा वापर

0

नागपूर(Nagpur): नागपूर शहर पोलिस दल अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानसज्ज होत असून आता पोलिसांच्या गस्तीसाठी ‘सेग-वे’ अर्थात बॅलन्सिंग स्कूटरचा वापर सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलिसांना कमी वेळेत अधिक परिसरात गस्त घालणे शक्य होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मोठी मदत मिळणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या सहकार्याने आणि मिहान इंडिया प्राधिकरणाच्या सौजन्याने पोलिस आयुक्तालयाला पाच सेग-वे स्कूटर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्कूटरचा वापर विशेषतः ज्या ठिकाणी पायी गस्त घातली जाते त्या भागात करण्यात येणार आहे.

सोनेगाव तलाव, अंबाझरी, फुटाळा तलाव परिसर, सीताबर्डी बाजारपेठ तसेच सक्करदरा-ताजबाग परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी या स्कूटर उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः चोरी, घरफोडी आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचणे सोपे होणार आहे.

डॉ. सिंगल यांनी सांगितले की, या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम पाहून भविष्यात सेग-वे स्कूटरची संख्या वाढविण्याचाही विचार केला जाईल. यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना वॉकी-टॉकी आणि बॉडी वॉर्न कॅमेरेही देण्यात येणार आहेत.

या स्कूटरमध्ये अलार्म प्रणाली, सार्वजनिक सूचना देण्यासाठी अनाउंसमेंट सुविधा तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंगची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन साहित्य ठेवण्यासाठी विशेष जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेनंतर सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर आणि त्यांच्या पथकाने सेग-वे स्कूटरचे प्रात्यक्षिक सादर केले.

Nagpur Police Go 'Smart': Segway Balancing Scooters to Patrol Markets and  Crowded Areas