‘अभंग रिपोस्ट’ मध्ये रसिकांची ब्रम्हानंदी समाधी

0

विठ्ठलाच्या भक्तीने फुललेल्या गाभार्‍याची अनुभूती
सुपरस्टार मिथुनदांनी केली ‘वाहवाही’
खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात समारोप

 

 

 

 

नागपूर (Nagpur), 16 फेब्रुवारी
आधुनिक वेशभूषा केलेल्‍या सहा युवकांनी पारंपरिक अभंगांना पाश्‍चात्‍य संगीताचा बाज चढवत मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित ज्‍येष्‍ठांच्‍या काळजाला हात घालत, त्यांना ठेका धरायला, नाचायला आणि फुगड्या खेळायला भाग पाडले. संतश्रेष्ठ ज्ञानदेव, तुकाराम, जनाबाई, नामदेव, तुकडोजी महाराज यांचे अभंग ऐकताना, जिन्स पँट घालूनही वारी करता येते हेच या कलाकार मंडळींनी सिध्द केले. या आधुनिक लाईव्‍ह बँडला प्रसिद्ध अभिनेते म‍िथुन चक्रवर्ती यांनी भरभरून दाद दिली.
निमित्‍त होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाच्‍या समारोपीय कार्यक्रमाचे. रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘अभंग रिपोस्ट’ हा लाईव्ह बँड चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाने अवघ्या सभागृहाला विठ्ठलाच्या भक्तीने फुललेल्या गाभार्‍याची अनुभूती दिली.

 

 

 

 

 

मुख्य गायक प्रतिश म्हस्के, दुष्यंत देवरुखकर (ड्रम), स्वप्नील तरपे (बास गिटार), अजय वव्हाळ (गिटार), तुषार तोतरे (हार्मोनियम), रोशन आडे (तबला) या युवकांनी तरुण पिढीपर्यंत आपले अभंग पोहचविण्यासाठी या बँडची स्थापना केली. संत परंपरेतील अभिजात जुन्या अभंगाला आधुनिक नवसंगीताचा साज चढवून हा अनमोल नजराणा रसिक दरबारी पेश केला. या फ्युजन अभिव्यक्तीने उपस्थित विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठलचा गजर सभागृहात उमटला आणि लहानपण देगा देवा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, देह देवाचे मंदिर, कशाला काशी जातो रे बाबा , चंदनाचे हात, चल ग सखे पंढरीला, आम्ही बी घडलो या अभंगांच्या मंत्रमुग्ध सादरीकरणाने अतिशय वेगळ्या स्वॅग असणार्‍या या गायकांनी उपस्थितांना गायनात सामावून घेतले. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोअरचे स्वर सतत निनादत होते. भक्तीचा परिमल टिपेला पोहचला आणि पसायदानाने या अप्रतिम कार्यक्रमाची समाप्ती झाली. नवीन पिढीने उत्कृष्टरित्या सांभाळलेल्या या अभंगधनाचे ज्येष्ठांनी जयजयकार करत अमाप कौतुक केले.

स्वप्नांना न अव्हेरता साकार करा – : मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty)

स्वप्नांना अव्हेरू नका, ते सफल होण्यासाठीच पडत असतात. अंतर्मन कधीही खोटी साक्ष देत नाही, तेव्हा आतला आवाज ऐकून ध्येयपथावर मार्गक्रमण करा, असे प्रतिपादन पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केले.

 

खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर तरुण भारतचे मुख्य संपादक सुधीर पाठक, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, उपाध्यक्ष अशोक मानकर, एलआयसीचे माजी महाव्यवस्थापक निलेश साठे, प्रतापसिंग चव्हाण, डॉ. संजय उगेमुगे, नारायण समर्थ आणि अविनाश घुशे यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रयागराज येथे कुंभस्‍नानासाठी आमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यामुळे ते कार्यक्रमाला वेळेवर पोहोचू शकले. त्‍यामुळे त्‍यांनी दूरध्‍वनीद्वारे सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.

मिथुन चक्रवर्ती यानी नितीन गडकरी यांच्‍या कार्याचे कौतुक करताना त्‍यांच्‍यासारखे उत्कृष्ट, उत्तुंग नेतृत्व आपल्याला लाभले आहे, त्यांच्यासोबत राहणे हा आपला सन्मान आहे, असे उद्गार काढले. गडकरी यांनी ज्या उद्देशाने हा मंच स्थापन केला, त्याला प्रगतीपथावर न्यावे तसेच योग्य कार्य करणाऱ्यांना शासनाला साथ द्यावी, असे आवाहन याप्रसंगी मिथुन चक्रवर्ती यांनी केले. रसिकांनी त्यांना त्यांच्या चित्रपटाचे डायलॉग म्हणायचा आग्रह करताच, वरिष्ठांचा मान राखत त्यांनी एक संवादही सादर केला.

शेवटपर्यंत वृद्धांच्या अडचणी दूर करण्याचे करण्‍याचे आश्‍वासन दत्ता मेघे यांनी दिले. व्रतस्थ पत्रकार या शब्दात त्यांनी सुधीर पाठक यांचा गौरव केला तर मिथुन चक्रवर्ती यांनाही शुभकामना दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन अशोक मानकर यांनी केले.

ग.त्र्यं. माडखोलकरांचे स्‍मारक व्‍हावे – सुधीर पाठक

याप्रसंगी ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्‍येष्‍ठ पत्रकार सुधीर पाठक यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुधीर पाठक यांनी, ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या सिंहासनावर बसायची मला संधी मिळाली व जे काही घडवता आले ते मी घडवले. माडखोलकरांचे नागपूर येथे स्मारक व्हावे व शहरातील पत्रकारितेचा गौरव करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.