
मुंबई MUMBAI : महाविकास आघाडीच्या काल पार पडलेल्या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, जागावाटपाबाबत मतैक्य होऊ शकलेले नाही. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाली असली तरी ८ जागांवर रस्सीखेच कायम आहे. ही रस्सीखेच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येच असल्याचे दिसत आहे. (MVA Seat Sharing Formula)
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद असलेल्या आठ जागांबाबत ठाकरे गटाचा हट्ट कायम आहे. या आठ जागांमध्ये हिंगोली (हेमंत पाटील, शिवसेना शिंदे गट), वर्धा (रामदास तडस, भाजप), भिवंडी – (कपिल पाटील, भाजप), जालना ( रावसाहेब दानवे, भाजप), शिर्डी (सदाशिव लोखंडे, शिवसेना शिंदे गट), मुंबई दक्षिण मध्य ( राहुल शिवाळे, शिवसेना शिंदे गट), मुंबई उत्तर पश्चिम (गजानन कीर्तिकर, शिवसेना शिंदे गट), रामटेक (कृपाल तुमाने, शिवसेना शिंदे गट) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांवर काँग्रेस व ठाकरे गट या दोघांनीही दावा केलाय.
शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरे गटाची ताकद राहिलेली नाही, असा दावा काँग्रेसकडून सुरु आहे. तर काँग्रेसने या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आम्ही होतो, असा दावा केलाय. विशेषतः मुंबईच्या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडण्याची ठाकरे गटाची अजिबात तयारी नाही. अशातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी झालेली असताना त्यांच्याकडूनही जागांची मागणी होणार आहे. त्यांच्यासाठी जागा कोणी सोडायच्या, असा प्रश्नही निर्माण होत आहे. आता २ फेब्रुवारीला पुन्हा जागावाटपाची बैठक होणार असून त्यात हा तिढा सुटण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघ सोडण्याची इतर घटकपक्षांची आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीत आणखी काही मतदारसंघांसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.