सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोगोमध्ये सावित्रीबाईचा फोटो लावा

0


– राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी


नागपूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोगो मध्ये सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय सहसचिव प्रा.शरद वानखेडे यांनी केली आहे. गणेशपेठेतील शुक्रवारी तलाव परिसरातील उद्यानात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले १९३ व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना उपस्थित समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव राजेश काकडे होते.
प्रा.वानखेडे पुढे म्हणाले की, भारतातील मुलींची पहिली शाळा म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मिळून पुणे येथील भिडेवाडा येथे सुरु केली व भारतातील महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. या अविस्मरणीय अशा ऐतिहासिक घटनेची दखल शासनाने घेवून पुण्यातील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित करावे व तेथे सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अमोल अशा शैक्षणिक कार्याचे जतन करावे अशीही मागणी त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सरकारकडे केली. कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, शहर अध्यक्ष परमेश्वर राऊत, गणेश नाखले, नाना झोडे, राजू मोहोड, संजय मांगे, प्रवीण विघरे, विनोद उलीपवार, ऋतिका डफ, तेमराज माले , बाबा बिडकर, राजू बोचरे,हेमंत गावंडे, उमेश कोरम, उत्तम सुळके यांच्यासह अनेक ओबीसी बांधव यावेळी उपस्थित होते.