नागपूर झाले ‘राममय’

0

-श्री पोद्दारेश्वर मंदिरची ऐतिहासिक शोभायात्रा, 80 चित्ररथांचा समावेश

नागपूर : श्रीराम नवमीच्या पर्वावर नागपुरात निघणाऱ्या तीन शोभायात्रांच्या निमित्ताने नागपूर गुरुवारी ‘राममय’ झाले आहे. कोरोना संकट, 3 वर्षांच्या खोळंब्यानंतर यंदा पुन्हा निर्बंधमुक्त मोठ्या जल्लोषात शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर, रामनगर राम मंदिरातून निघणारी पश्चिम नागपूर शोभायात्रा आणि उत्तर नागपुरात श्री बेलीशॉप शिव मंदिराची राम शोभायात्रा प्रमुख आहे. शतायुषी वाटचाल करणाऱ्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या ऐतिहासिक शोभायात्रेचे यंदा 57 वे वर्ष असून यानिमित्ताने शहरात अयोध्याच अवतरल्याचा भास होत आहे. यंदा 80 हून अधिक चित्ररथ सहभागी झाले असून श्रीराम, लक्ष्मण, सीता विराजमान असणारा मुख्य गजरथ आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा झाला. दुपारी 4.30 वाजता पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून शोभायात्रेचा शुभारंभ झाला.

शोभायात्रेत मंगलवाद्य पथक, स्केटिंग पथक, शिवगर्जना पथक, लोकनृत्य पथक, मंगल कलशसह 500 जणांचे शंख वादन करणारे पथक सहभागी असून अनेक चित्ररथही लक्ष वेधून घेत आहेत. यात छत्रपती शिवरायांना आई भवानीने दिलेली तलवार, हनुमानाचा शंखनाद, शिव-पार्वती विवाह, आई बालाजी दर्शन, महाबली हनुमानाची वानरसेना, भोले भंडारीचा नंदी, रामसेतू निर्माण, रावण जटायू युद्ध, होळीच्या रंगात रंगणारे राधाकृष्ण, नृसिंह अवतार, पंढरीची वारी, हनुमानाची शिव आराधना, रामेश्वर ज्योतिर्लिंग स्थापना आदी प्रसंग विविध चित्ररथांतून दिसले. मोमिनपुरा परिसरात शोभयात्रेचे परंपरागत पध्दतीने स्वागत झाले. शोभायात्रेच्या मार्गावर स्वागतद्वारे उभारली गेली असून विविध संस्थांकडून प्रसाद, शरबत, शीतपेय वितरन करण्यात आले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा