नागपुरत पर्सिस्टंटचे नवे युनिट लवकरच कार्यान्वित होणार पहिल्या टप्प्यात 3 हजारांना रोजगार

0

नागपूर. जगभरातील आयटी क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्या कर्मचाऱ्यांना घरची वाट दाखवत असताना पर्सिस्टंटने (Persistent) मात्र मिहानमध्ये (MIHAN) नवीन युनिटचे भूमिपूजन केले आहे. या युनिटच्या पहिल्या टप्प्यात 2,500 ते 3,000 लोकांना रोजगार (2,500 to 3,000 people get Employment) मिळणार आहे. एकीकडे गुगल, फेसबुक, ट्विटरने कर्मचार्यांची संख्या कमी करून आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत दाखविले आहेत, तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंटने नव्या युनिटची पायाभरणी केली आहे. पर्सिस्टंट ही नागपूरसाठी नवीन गोष्ट नाही. गायत्रीनगर आयटी पार्कमधील पर्सिस्टंट सिस्टिम्सचे कार्यालय नागपूरकरांना परिचित आहे. येथे नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. आयटी पार्क येथे असलेले युनिट यशस्वीपणे सुरू आहे. कंपनीने कोविडच्या काळात मिहानमध्ये नवीन युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, आता त्याची पूर्तता केली जात आहे.
कंपनीने मिहानमधील स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मध्ये 13.5 एकर जमीन संपादित केली आहे. येथे नवीन युनिट बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 3000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने रोजगार निर्मिती वाढवली जाईल. भूमिपूजन समारंभाला पर्सिस्टंट सिस्टम्सचे अध्यक्ष आणि प्रशासकीय संचालक आनंद देशपांडे, त्यांच्या पत्नी पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.
आयटी कंपन्यांचा विस्तार
एचसीएलने विस्तार करताना नवीन इमारत तयार केली असून कर्मचाऱ्यांची भरतीही नियमितपणे सुरू आहे. मिहानमधील टीसीएस मोठ्या प्रमाणात स्थानिक आणि विदर्भातील तरुणांना रोजगार देत आहे. टीसीएसच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात 1000 युवकांना रोजगार मिळणार आहे. कंपनीत सध्या 4,500 तरुण कार्यरत आहे आणि मिहान कॅम्पसमध्ये 10,000 तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. इन्फोसिसच्या नवीन इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्याही निर्माण होण्याची अपेक्षा आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचवेळी या कंपन्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याचे मोठे आव्हानही असणार आहे.