Home MAHARASHTRA नागपूरचा श्रीमंत बुटी वाडा आणि संघाचा घोष….

नागपूरचा श्रीमंत बुटी वाडा आणि संघाचा घोष….

0

नागपूर (Nagpur) :-

राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात संघ घोषाची परंपरा हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी सोनेरी पान मानले जाते. संघ स्थापनेपासूनच पूजनीय डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांच्या मनात संघटनेचा स्वतःचा एक लष्करी शैलीचा बँन्ड (घोष)असावा अशी कल्पना होती. शिस्त, सामूहिकता आणि उत्साह यांचे प्रतीक म्हणून घोषाला विशेष महत्त्व देण्यात आले. या संकल्पनेची पहिली झलक १९२८ साली संघाच्या पहिल्या संचलनाच्या वेळी दिसून आली. संघाच्या प्रारंभीच्या काळात आर्थिक साधने अत्यंत मर्यादित होती. त्यामुळे अनेक स्वयंसेवक विविध प्रसंगी मिळणाऱ्या दक्षिणेचा उपयोग संघकार्याकरिता करीत. नागपूरमधील श्रीमंत गोपाळराव बुटी यांच्या वाड्यात जन्माष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण भोजन आयोजित केले जात असे.

बुटी घराण्याचे कुलदैवत भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे या उत्सवाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व होते. याच ऐतिहासिक वाड्यात १९०८ मध्ये शेगावचे संत श्री गजानन महाराज यांनी सहा महिन्यांचा मुक्काम केल्याची घटना सर्वश्रुत आहेच. संघ स्थापनेच्या सुरुवातीच्या काळातील स्वयंसेवक असलेले बाळासाहेब देवरस,भाऊराव देवरस, मार्तंडराव जोग, दादाराव परमार्थ आदी तरुण स्वयंसेवक जन्माष्टमीच्या या ब्राह्मण भोजनाला जात असत. भोजनानंतर मिळणारी दक्षिणा त्यांनी स्वतःसाठी न वापरता संघकार्याकरिता जपून ठेवली. या जमा झालेल्या पैशांतून संघासाठी पहिला शंख-बिगुल विकत घेण्यात आला. या घटनेमुळे संघाच्या घोषामध्ये पहिले वाद्य अधिकृतपणे सामील झाले आणि पुढे संघ घोषाच्या समृद्ध परंपरेचा पाया घातला गेला.

या प्रसंगामुळे नागपूरमधील बुटी वाडा आणि संघाच्या घोषाचा इतिहास यांच्यात एक अनन्य आणि स्मरणीय संबंध निर्माण झाला. अल्प साधनांतूनही संघकार्याची उभारणी करण्याची स्वयंसेवकांची वृत्ती, त्यांची संघनिष्ठा आणि त्यागभावना यांचे हे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून संघाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहिले आहे. नागपूरच्या घोष विभागाचा देदीप्यमान इतिहास असलेले हस्तलिखित राष्ट्र स्वराधना याचे आज स्मृती मंदिर परिसरात परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यानिमित्ताने स्मृतींची चाळता पाने…….

-डॉ भालचंद्र रेवती माधव हरदास
॥ चैत्र कृ ६, फणींद्रपुर॥