केंद्रीय मंत्री राणेंची नार्को चाचणी करा, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची मागणी

0

मुंबई : शिवसेनेचा ठाकरे गट आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता आणखी विकोपाला गेला आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांची नार्को चाचणी केली तर खुनाच्या अनेक घटना उघडकीस येतील, असा आरोप राऊत यांनी (MP Vinayak Raut on Narayan Rane) केला असून राणे यांनी आपल्या चुलत भावाचा खून केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमदार नितेश राणे हे दिशा सालियन प्रकरणावरू ठाकरेंना लक्ष्य करीत असतानाच आता ठाकरे गटाने पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या वडिलांची कारकीर्द आठवावी, असा सल्लाही विनायक राऊत यांनी कणकवली येथे एका कार्यक्रमात बोलताना राणेंना दिलाय.
विनायक राऊत म्हणाले की, राणेच्या कारकीर्दीत जितके खून झाले व लोक बेपत्ता झाले, त्याची एसआयटी चौकशी व्हायला हवी. राणे यांनी या प्रकरणी नार्को चाचणीही करता येईल. त्यातून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला, हे स्पष्ट होऊ शकेल. आमच्या कारकीर्दीत आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतता हवी असल्याचे खासदार राऊत म्हणाले.


दरम्यान, राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आणखी एक आरोप केला आहे. राणे यांच्या सचिवांने अनेकांची फसवणूक केली असून स्वतः पंतप्रधान मोदी यांनी राणे यांची त्यावरून चांगलीच कानउघडणी केली असल्याचा खासदार विनायक राऊत यांचा दावा आहे.
अलिकडेच आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरण उचलून धरले होते. या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यावरून आता ठाकरे गट आणि राणेंमध्ये वाकयुद्ध सुरु आहे.