नवज्योत सिंग सिद्धू तिनशे दिवसानंतर कारागृहाबाहेर

0

पतियाळाः पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची (Navjot Singh Sidhu) पतियाळा तुरुंगातून सुटका झाली आहे. 1988 मध्ये पंजाबमधील पतियाळा येथे 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत पार्किंगवरून झालेल्या वादात सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना ठोसे मारले व त्यात गुरनामचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. सिद्धू हे तब्बल 317 दिवसांनंतर पतियाळा सेंट्रल जेलमधून बाहेर आले आहेत. या शिक्षेच्या दरम्यान त्यांनी कोणतीही रजा न घेतल्याने त्यांची आधीच सुटका झाली. दरम्यान, कारागृहातून सुटका झाल्यावर समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या स्वागतासाठी त्यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना पतियाळा तुरुंगात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी त्यांच्या स्वागतासाठी जाण्यास नकार दिला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर कर्करोगाने ग्रस्त आहे. त्यांना स्टेज-2 कॅन्सर आहे. अलीकडेच त्यांनी पतीसाठी एक संदेश लिहिला होता की त्या त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा करू शकत नाही. त्यांचा त्रास वाढत आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना लवकर सोडण्याची मागणी केली होती, हे विशेष. या प्रकरणात सप्टेंबर 1999 मध्ये पंजाबमधील न्यायालयाने सिद्धू यांना निर्दोष मुक्त केले होते. परंतु, डिसेंबर 2006 मध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धू आणि अन्य एकाला अहेतुक हत्ये प्रकरणी दोषी ठरवत 3-3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आल्यावर तेथेही न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. गुरनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा