अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या दुस-या दिवशी सीताफळ लागवड, मधमाशी पालन, नवीन कापूस तंत्रज्ञान, जवस,
भाजीपाला, बांबू लागवड, मशरूम उद्योग अशा विविध विषयांवरच्या कार्यशाळा पार पडल्या. या कार्यशाळांना तरुण व
शेतक-यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
‘सीताफळ लागवड आणि प्रक्रिया : विदर्भातील संधी’ या विषयावरील कार्यशाळेत सीताफळ महासंघ पुणेचे अध्यक्ष श्यामगट्टाणी यांनी मार्गदर्शन केले. हलक्या जमिनीवर माळरानावर किंवा खडकाळ जमिनीवरसुद्धा सीताफळाची लागवड
होते. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सीताफळाच्या बाग लागतात. नैसर्गिक रित्या आपल्याकडे सीताफळाची झाडे
सापडतात. या झाडासाठी वातावरण आणि जमीन आपल्याकडे पोषक आहे, असे ते म्हणाले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सोनाली बोरकर यांनी केले.‘मधमाशी पालन’ या विषयावरील कार्यशाळेला तज्ञ डॉ. आनंद जक्कुरवार यांनी मार्गदर्शन केले. मधमाशी ही कृषी लक्ष्मी असून हा शेतीपूरक असा व्यवसाय आहे. मधमाशी पालन करायला आपल्याला आपली पिक पद्धती बदलणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
‘नवीन कपास तंत्रज्ञान एचडीपीएस/वीण व्यत्यय आणि मल्चिंग शेतीसाठी मातीचे आरोग्य’ या विषयावरील कार्यशाळेला
वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान, विस्तार आणि प्रशिक्षणाचे प्रमुख, जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे डॉ. बाळकृष्ण जडे,
शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले व महाराष्ट्राचे कापूस अध्यक्ष पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी प्रतिनिधी
अकोल्याचे दिलीप ठाकरे यांनीदेखील अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. विजय बासुंदे यांनी केले.
‘माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर’ या विषयावर चर्चासत्र
कल्पना खूप असतात. त्यावर संशोधन करून तंत्रज्ञानही विकसीत करता येते. पण गरज आधारित संशोधन, उपयुक्त
तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि बाजाराची मागणी पूर्ण करणा-या उत्पादनाची
देशाला अधिक गरज असल्याचे मत अॅग्रोव्हिजनचे प्रवर्तक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या दुस-या दिवशी
सकाळच्या सत्रात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय), नागपूरच्या सहकार्याने ‘माहिती तंत्रज्ञानाचा
शेतीतील वापर’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात श्री. नितीन गडकरी ते बोलत होते.
चर्चासत्रात कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर इंजिनियरींगचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
अकोलाच्या फार्म स्ट्रक्चर विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुचिता गुप्ता, एसटीपीआय पुणेचे अतिरिक्त संचालक सचिन
पुर्णाळे, नागपूर केंद्राचे अतिरिक्त संचालक संजय दरणे, फसलचे सीईओ प्रा. प्रशांत खांडे, डिजीक्रॉपचे संस्थापक धनंजय झिंगे व कृषीगतीचे संस्थापक तुकाराम सोनवणे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे अन्न प्रक्रिया मंत्री नारायण सिंग कुशवाह व प्रधान सचिव कृषी विभाग अनुपम रंजन यांनीदेखील हजेरी लावली. मिलिंद कापजे यांच्या
हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले, परदेशात कृषीला लागणारी छोटी छोटी उपकरणे मोठ्या प्रमाणात तयार केली जातात. तशीच
उत्पादने आपल्या तरुण पिढीने संशोधित करून तयार केल्यास त्यांना चांगली मागणी आहे. भौगोलिक
परिस्थितीनुसार उत्पादने तयार केल्यास ती जास्त उपयोगी ठरतील, असे ते म्हणाले. अॅग्रोटेकशी संबंधित संघटना
तयार करावी, अॅग्रोव्हिजन त्या शक्य ती सर्व मदत करेल, असेही ते म्हणाले.डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी पीडीकेव्हीमध्ये असलेल्या तीन इन्क्युबेशन सेंटरची माहिती दिली. व्हर्टीकल फार्मिंगसाठी लॅब, पॉलिहाऊसेस, संशोधन, स्टार्टअप्सला मेंटरशिप उपलब्ध करून दिली जाते, असे ते म्हणाले. प्रा. डॉ. सुचिता गुप्ता यांनी पर्यावरणातील बदलांमुळे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर काळाची गरज झाली असून तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषीशी जोडले जाऊ शकते. कृषी क्षेत्रातही उत्तम तंत्रज्ञ तयार होऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. सचिन पुर्णाळे यांनी आयटी, आयटीजचा कृषी क्षेत्रात वापर करून शेतक-यांसाठी उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करू शकतात असे सांगितले तर संजय दरणे व डॉ. प्रशांत खोंड यांनी नागपूर व पुण्याच्या एसटीपीआयच्या कार्याची माहिती दिली.
धनंजय झिंगे यांनी त्यांचे डिजीक्रॉप स्टार्टअप शेतकरी व ग्राहकांना जोडण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.
कृषीगती स्टार्टअपच्या जन्माची कहाणी तुकाराम सोनवणे यांनी सांगितले. मोहन राव यांनी परिचय करून दिला तर या
सत्राची सुत्रे अमीत कुरील यांनी सांभाळली.