
नागपूर (Nagpur) :- नागपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय माजी महापौर व विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी जाहीर केला आहे. अचानकपणे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा करत त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपसारख्या सत्ताधारी आणि संधी उपलब्ध असलेल्या पक्षातील अनुभवी नेत्याने स्वतःहून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उष्णता आली आहे. “आता मला थांबायचंय” असे स्पष्ट शब्द वापरत संदीप जोशी यांनी भावनिक पत्राच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली असून, हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नव्हे तर सखोल विचारांती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूरचे संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी लिहिलेल्या या पत्रात राजकारणाबाबतची आपली प्रामाणिक भूमिका मांडली आहे. राजकारण हे नेहमीच पद, प्रतिष्ठा किंवा सत्तेपेक्षा समाजसेवा आणि निष्ठेचे माध्यम मानले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र सध्या सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढती स्पर्धा यामुळे सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, असे सांगत जोशी यांनी या परिस्थितीत आपणच थांबावे, हा विचार मनात ठाम होत गेल्याचे पत्रात नमूद केले आहे. वयाची ५५ वर्षे पूर्ण झाल्याने तरुणांना संधी देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
आपली विधान परिषदेची आमदारकी १३ मे रोजी संपुष्टात येत असून, तोपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र १३ मेनंतर आमदारकी मागणार नाही आणि पक्षाने दिली तरी नम्रपणे नकार देणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ही संधी एखाद्या तरुण किंवा पक्ष निर्णय घेईल त्या कार्यकर्त्याला मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्या तारखेनंतर आपण पूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
या निर्णयाबद्दल भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व — केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस — यांची माफी मागत, पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून दिलेल्या संधींसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत पक्षाने सन्मान दिल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
राजकारणातून निवृत्त होत असलो तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य सुरूच राहणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या काळात सुरू केलेला ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा उपक्रम, गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर यासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध क्रीडा संघटनांमधील जबाबदाऱ्या निभावत तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्राच्या शेवटी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो,” असे सांगत त्यांनी स्वतःला न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
संदीप जोशी यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे नागपूरसह राज्याच्या राजकारणात नवा चर्चाविषय निर्माण झाला असून, त्यांच्या पुढील सामाजिक भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



















