
नियमभंग केल्याने ६ आरएमसी प्लांट तात्काळ बंद
नागपूर (Nagpur) :- हिंगणा एमआयडीसी परिसरात रेडीमिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमुळे वाढलेल्या वायुप्रदूषणावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) सहा आरएमसी प्लांट तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, संबंधित कंपन्यांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्लांटचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत.
हिंगणा एमआयडीसीतील प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्यानंतर एमपीसीबीने विशेष तपास मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान पर्यावरणीय लेखापरीक्षण करण्यात आले असता काही प्लॉट आणि प्लांट पर्यावरणीय नियमांचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले. हिंगणा एमआयडीसी परिसरात एकूण १९ आरएमसी प्लांट कार्यरत असून, त्यापैकी सहा प्लांट तपासणीत दोषी आढळले. त्यामुळे या सहा प्लांटवर तात्काळ बंदची कारवाई करण्यात आली आहे.
बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये एसीसी लिमिटेड, प्रिझम जॉन्सन लिमिटेड, एस.एस. इन्फ्राटेक, गोल्ड क्रिएट इन्फ्रा प्रॉडक्ट्स आणि आरडीसी काँक्रीट इंडिया यांचा समावेश आहे. एमपीसीबीच्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या नव्या पर्यावरणीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर विभागात एकूण ४७ आरएमसी प्लांट कार्यरत आहेत. त्यापैकी हिंगणा एमआयडीसीतील १९ प्लांटना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तपासणीत सहा प्लांट गंभीर स्वरूपात नियमभंग करत असल्याचे आढळून आले, तर उर्वरित प्लांट्सना सुधारात्मक सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून हिंगणा एमआयडीसी परिसरात आरएमसी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ हवेत मिसळत होती. पीएम-१० आणि पीएम-२.५ या घातक कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले होते. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, अॅलर्जी यांसारख्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती. याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि इतर उद्योगांवरही होत असल्याचे निदर्शनास आले होते.
दरम्यान, “आमचा उद्देश कंपन्या बंद करणे नसून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा आहे. जे प्लांट पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई सुरूच राहील,” असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी केले आहे.
या कारवाईमुळे हिंगणा एमआयडीसी परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांसाठी हा कडक इशारा मानला जात आहे.



















