हे राम… देवाच्या दारीही ठगबाज पूजा पडली 70 हजारांत

0

अमरावती: फसवेगीरीच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ (rise in fraud cases ) झाल्याचे दिसत आहे. जवळपास रोजच फसवणुकीची प्रकरणे राज्याच्या सर्वच भागांतून समोर येत आहेत. घाम न गाळता अधिक मिळकतीचा सोपा पर्याय म्हणून गुन्हेगारांनी हा मार्ग निवडला आहे. ठगबाजांनी देव्हारेही सोडले नाहीत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या संत गजानन महाराज मंदिरातून (Sant Gajanan Maharaj Temple of Daryapur in Amravati District ) फसवेगीरीचे अजब प्रकरण समोर आले आहे. ठगबाजांनी हात चलाखी दाखविली आणि मंदिराय येऊन पूजा करणे महिलेला तब्बल 70 हजारांमध्य पडले. त्याचे झाले असे की, आरोपींनी तिचे दागिने घेतले. कागदात गुंडाळत असल्याचा आभास निर्माण करीत ते महिलेकडे सोपविले. महिलेने कागदी पुडी उघडली असता गिट्टीचे खडेच हाती लागले आणि कपाळावर हात मारून घेण्याची वेळ महिलेवर आली.
दर्यापुरातील 47 वर्षीय महिला शनिवारी सकाळच्या सुमारास परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात पूजेसाठी गेली होती. तेथे आधीच असलेल्या दोघांनी तिला हेरले. बोलण्यात गुंतविले. बोलण्या बोलण्यात पूजा करण्याच्या बहाण्याने त्या दोन अनोळखी आरोपींनी महिलेकडील तीन ग्रॅमची अंगठी, सोन्याचा गोफ असे एकूण ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वत:कडे घेतले. त्या दागिन्यांची पुडी बांधून महिलेकडे दिली. ती पिशवीत ठेवण्याची सूचना करून आरोपी तेथून निघून गेले. काही वेळाने महिलेने स्वत:कडील पुडी पाहिली असता, तिला धक्का बसला. सोन्याच्या दागिन्यांऐवजी तिला त्या पुडीत गिट्टीचे खडे दिसून आले. त्या दोन अनोळखींनी हातचलाखी करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने दर्यापूर पोलीस ठाणे गाठले. रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लगेचच पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात दर्यापूर पोलिस करीत आहेत.
अशाप्रकारच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी अनेकजण सावध असतातच. पण, ठगबाज आजवर मंदिरांपासून काहीचे लांब असल्याचे दिसत होते. आता मात्र त्यांनी मंदिरही शिरकाव केल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे. यामुळे दर्शनासाठी जात असतानाही सावध राहण्याची गरज आहे