
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी अख्खे मुंबई विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी-कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहे. सोमवारपासून सचिवालयाचे कामकाजही सुरू झाले असून, विधिमंडळाचा ताबा आता विधिमंडळ सुरक्षा रक्षकांच्या हातात आला आहे. मुंबई महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेचे नेमके कामकाज कसे चालते?, विधिमंडळात कोणकोणते प्रश्न मांडले जातात ? विधिमंडळाच्या कामकाजाची वेळ किती ? यासह एकूणच महाराष्ट्राचे राजकारण कसे आहे, हे समजून घेण्यासाठी किंबहुना यावर दरवर्षी २0 ते २५ सुशिक्षित नागरिक पीएचडी करीत असल्याची माहिती आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जवळपास पूर्णत्वास आली आहे. सोमवार, १९ डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशनास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सोमवार, १२ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या ग्रंथालय विभागाचे कामकाज सुरू झाले आहे. ग्रंथालयाविषयी अधिक माहिती देताना तेथील अधिकार्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य १९६0 पासून अस्तित्त्वात आले. १९६0 पासून सुरू झालेल्या विधिमंडळाचे सर्व कागदपत्रे ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ‘पीएच.डी’ करणार्यांसाठी प्रत्येक संदर्भाची पुस्तके ग्रंथालयात आहेत. १९५२ पासून अस्तित्वात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचे व संदर्भसुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर, देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालयांतील विविध प्रकरणांचेही एकूण १२ लाखांच्या जवळपास कागदपत्रे विधिमंडळ ग्रंथालयात उपलब्ध आहेत.