वर्धा: साखरपुडा ओटोपला, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पत्रिकाही वाटल्या गेल्या, लग्नबस्ता खरेदीही झाली. वर-वधुही सुखी संसाराचे स्वप्न रंगवित एक एक दिवस पुढे ढकलत होते. लग्न आता केवळ चार दिवसांवर येऊन ठेपले होते. त्यामुळे लगबग अधिकच वाढली होती. लवकरच पाहुणे मंडळींचेही लग्नघरी आगमन होणार होते. सर्वत्र आनंदी आनंद असताना अचानक कोणत्यातरी कारणावरून वादाची ठिणगी पडली. वधुपक्षाकडून त्याबाबत थेट नवरदेवालाच जाब विचारला गेला. वधुकडील मंडळींची समजूत काढण्यासाठी वर स्वतः गेला. मुलीकडच्यांसोबत बोलणी करून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्नही केले. त्यानंतर मात्र वराने टोकाचे पाऊल उचलत त्याच गावात वीष प्राशन केले. त्यामुळे त्याचा मृत्यू (Committing suicide by pretending to be a husband ) झाला. वर्धा जिल्ह्यालगतच्या नागपूर जिल्ह्यातील कान्होली बारा गावाजवळच्या किनी भानसुली (Kini Bhansuli near Kanholi Bara village in Nagpur district ) येथे ही दुर्दैवी घटना घडली.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील झडशी या खेड्यातील रोशन गणपत लिडबे या युवकाचे लग्न नागपूर जिल्ह्यातील कान्होली बारालगत असलेल्या किनी भानसुली या गावातील मुलीसोबत जुळले होते. आनंदी वातावरणातच साक्षगंधही आटोपले होते. चार दिवसांवर आलेल्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना काही विघ्न आले. ते दूर करण्यासाठी रोशन सासुरवाडीतील मंडळींची समजूत काढण्यासाठी भानसुलीला पोहचला. उभय पक्षांमध्ये चर्चाही झाली. पण, त्यानंतर लगेच रोशनने त्याच गावात विष प्राशन करीत आत्महत्या केली. त्याच्या घरी झडशीला ही माहिती पोहोचताच आनंदावर विरजण पडून सर्वत्र शोककळा पसरली. मृताच्या कुटुंबीयांनी मृत्यूवर शंका उपस्थित केली आहे. हिंगणा पोलीसांकडे तक्रार करीत ही आत्महत्या संशयास्पद असून चौकशीची मागणी केली आहे. नागपूर पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार देण्यात आली आहे.
वधुच्या गावी पोहोचल्यानंतर तिथे नेमका काय घटनाक्रम घडला, ते कळायला मार्ग नाही. वादाचे नेमके कारणही समोर येऊ शकले नाही. वराने कुटुंबीयांना माहिती न देताच टोकाचे पाऊल का उचलले, या प्रश्नाने साऱ्यांनाच हैराण करून सोडले आहे. पोलिस तपासातूनच या साऱ्या प्रश्नांची उकल होऊ शकणार आहे.