पाटणा: भाजपाविरोधात एकत्र येण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पाटणा येथे संयुक्त विरोधी पक्षांची बैठक शुक्रवारी पार पडली असून या बैठकीत सर्व पक्षांनी भाजपविरोधी एकत्र येण्यास सहमती दर्शविली. देशभरातील २० हून अधिक विरोधी पक्षातील नेते या बैठकीत उपस्थित होते. पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी केली.
बैठकीतील घडामोडींची माहिती देताना नितीश कुमार यांनी सांगितले की, ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र वाटचाल करण्यास सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वच पक्षांनी एकत्रित स्वरूपात निवडणूक लढविण्याची सहमती दर्शवली आहे. पुढच्या बैठकीत कोण कुठून लढवणार, हे या बैठकीत ठरविण्यात येईल. सध्याचे सरकार देशहिताचे काम करीत नसून ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्याची लढाई देखील ते विसरू शकतात. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत, असेही ते म्हणाले.