Seema Haider प्रियकरासह भारतातच राहु देण्याची पाकिस्तानी महिलेची विनंती

0

नोएडा : India-Pakistan Love Story पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय व्यक्ती सचिन मीणा या दोघांची ओळख पबजी या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रियकरासाठी सीमा पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात दाखल झाली. हा प्रकार लक्षात आल्यावर ४ जुलै रोजी सीमाला अवैधरित्या भारतात प्रवेश तसेच सचिन व त्याच्या वडीलांना सीमाला अवैधरित्या आश्रय दिल्या प्रकरणी अटक करण्यात आली. १४ दिवसांनी त्यांना न्यायालयीन कोठडीनंतर शनिवारी तिघांची जामीनावर सुटका झाली. आता तुरुंगातून सुटल्यावर सीमा हैदरने तिला तिचा प्रियकर सचिन याच्यासह भारतात राहू देण्याची परवानगी देण्याची विनंती पंतप्रधान मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. पाकिस्तानात परत गेल्यास आपल्याला कोणीही जीवंत सोडणार नाही, अशी भीती तिनं व्यक्त केली आहे.

सीमा यापूर्वीच विवाहित आहे. तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदर हा तिला सतत मारहाण करत होता, असा तिचा आरोप आहे. पती तिच्या चेहऱ्यावर तिखट फेकून तिच्यावर अत्याचार करायचा, असाही तिचा आरोप आहे. मागील चार वर्षांपासून ती गुलामबरोबर राहत नव्हती, असेही तिने सांगितले. दरम्यान, भारतीय प्रियकर सचिनने तिची चारही मुले दत्तक घेतली आहेत, त्यामुळे आता तिला त्याच्याबरोबरच भारतात राहायचे आहे.
सीमाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात सचिनशी लग्न केले. हिंदू धर्मही स्वीकारला आहे. आता कोर्ट मॅरेज करण्याची आणि गंगेत स्नान करण्याचीही तिची तयारी आहे. सचिनला तीन वर्षांपासून ओळखते. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आता मी सचिनसोबत राहीन, पाकिस्तानात जाणार नाही, असे ती सांगते. भारतात मला खूपच चांगली वागणूक मिळाली. येथील कायदा व सुव्यवस्था तसेच राहणीमान देखील चांगले आहे, असे ती सांगते.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असून सामान्य खटल्याप्रमाणेच तो लढविला जाणार आहे. या दरम्यान पोलिसांचा तपासही सुरु राहणार आहे. न्यायालयाने त्यांना पत्ता न बदलण्याच्या व देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.