नागपूर- आईने ज्या खोलीत गळफास घेतला त्याच खोलीत मुलानेही गळफास घेत आत्महत्या suicide केल्याची हृदयद्रावक घटना गिट्टीखदान पोलिस स्टेशनमधील वैभवनगर येथे घडली. आई-बाबा गेले म्हणून मुलानेही जीवन संपविले आता माझा कोण आधार असे म्हणत आजी एकाकी झाली आहे. ऋषी रवी मडावी (वय १९) असे मृतक युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीच्या वडिलांचे निधन झाले. विरह सहन न झाल्याने त्याच्या आईने खोलीतील लोखंडी हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलाच्या निधनानंतर ऋषी हा आजी सीताबाई मडावी (वय ७२) यांच्यासोबत राहात होता. आजीला पेन्शन मिळते.आपल्याला कामधंदा नाही या भावनेतून त्याने आठ दिवसांपूर्वी मित्राचीच गाडी फोडली. त्याच्या मित्राने गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.रात्री आजीसोबत जेवण केले आणि नंतर खोलीतील लोखंडी हुकला दुपट्टा बांधून गळफास घेतला. त्याच्या आजीला टेबल पडल्याने आवाज आला. खोलीत बघितले असता ऋषी गळफास घेतलेला दिसला. आजीने हंबरडा फोडला. लगेच शेजारी जमले. गिट्टीखदान पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक नितीन विटोले यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी ऋषीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मी त्रस्त असून आत्महत्या करीत आहे’, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
