गेला निदान महिनाभर तरी नायलॉन मांजा विरुद्धची मोहीम नागपुरात सुरू आहे. कठोर कारवाईचे इशारे, धाडी, गुन्हे दाखल करण्याची धमकी, असं सगळं करूनही नायलॉन मांजाने बळी घेतलाच…कायद्याची भीतीच न वाटण्याचा हा परिणाम आहे की, आपली पतंग कोणी कापूच शकणार नाही, अशी तजवीज करून पतंगबाजीच्या मैदानात उतरताना कोणाच्याच जीवाची पर्वा न करण्याच्या मानसिकतेचा?
लोग इतना संभलसंभलकर चलते क्यु है
इतना डरते है तो फिर घरसे निकलते क्यु है
डॉ. राहत इंदोरींचा हा शेर बराच बोलका आहे. पराभवाच्या अनुभवाचे सोडा अलीकडे पराभवाची कल्पनाही मान्य होत नाहीय् इथे कोणाला. पतंगबाजीचा शौक तर आहे. आपली पतंग आकाशात उंच उडावी अशी अपेक्षाही आहे. दुसऱ्यांच्या पतंगी कापण्याची मनीषा आहे. दुसऱ्यांची पतंग कापली की ती लुटण्याचा आनंदही मनसोक्त लुटायचा आहे. फक्त स्वतःची पतंग मात्र अजिबात कटू द्यायची नाही इथे कुणालाच…युद्ध असो की खेळ, शाब्दिक भांडण असो की प्रत्यक्षातली हाणामारी, निवडणूक असो की एखादी गल्लीतली स्पर्धा… प्रत्येकाला फक्त विजयी व्हायचे आहे. दुसऱ्या क्रमांकाला विचारतो कोण? त्यामुळे यायचं तर पहिलंच यायचं. निल आर्मस्ट्राँग नंतर चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आठवतं तरी कोणाला इथे? पहिले आलात तरच जग तुम्हाला लक्षात ठेवेल, हीच तर शिकवण दिली जातेय् ना लहानपणापासून! मग हरण्याच्या शक्यतेचा विचार कोण, कशाला करेल? सगळ्यांना फक्त आणि फक्त जिंकायचं आहे. बास्स!
माझ्या विजयासाठी जगाचं वाटोळं झालं तरी चालेल…अगदी कोणाचा जीव गेला तरी बेहत्तर, अशाच मानसिकतेतली पिढी नायलॉनचा मांजा घेऊन उतरते आहे ना पतंगबाजीच्या मैदानात?
फक्त दुसऱ्यांच्या पतंगी कापायच्या. त्यासाठी पूर्वी मांजा काचेच्या बारिक आवरणाने धारदार करण्याची पद्धत अंमलात येत होती. आता आपली पतंग शाबूत राहावी, कुणालाच ती कापता येऊ नये म्हणून थेट नायलॉन मांजाचा वापर सुरू झाला. हा धागा इतका घातक की, त्याला हाताने अडवायला जावे तर हात चिरून टाकणार, दुचाकी वाहनांवर पालकांच्या छायेत समोर उभे राहून/बसून फिरण्याचा आनंद लुटणाऱ्या लहान मुलांचे गळे या धाग्याने चिरले जाण्याच्या, त्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना संख्येने वाढू लागल्या. म्हणून यंदा पोलिसांपासून तर सामाजिक संस्थांपर्यंत सर्वांनीच पुढाकार घेऊन या मांजाचा वापर करू नका असे सांगणे सुरू केले. पोलिस विभागाने कारवाईचे इशारे दिले. पण, कायद्याला जुमानतो कोण? खुशाल वापरत सुटले लोक नायलॉनचा मांजा. कित्येक लोक जखमी झाले. काहींचा मॄत्यू झाला. कटलेली पतंग लुटण्यासाठी भर रस्त्यावर, बेभान धावत सुटलेल्यांना सांभाळताना आणि रस्त्यावर आडवा पडलेला मांजा बाजूला सारून गाडी पुढे काढताना होणारी पब्लिकची दमछाकही आनंदाच्या उधाणापुढे कवडीमोल ठरली. कुणाचा तरी आनंद अन् कुणाच्या तरी ईगोसाठी नाहक कुणाचातरी जीव गेला, याची जाणीव देखील कुणाला होऊ नये, हे फारच वेदनादायक आहे.
पराभवाच्या भितीने स्पर्धेतच उतरायचे नाही आणि उतरायचेच झाले तर मग विजयाची खातरजमा करूनच मैदानात प्रवेश करायचा, या विचित्र, पराभूत मानसिकतेचा परिणाम तर नसेल ना, नायलॉन मांजाचा हा विषप्रयोग?