Home Artical Blog उन्हाळ्याच्या पूर्वतयारीसाठी विविध भागांत आज वीज बंद; महावितरणचे सहकार्याचे आवाहन

उन्हाळ्याच्या पूर्वतयारीसाठी विविध भागांत आज वीज बंद; महावितरणचे सहकार्याचे आवाहन

0

नागपूर(Nagpur), दि. 08 एप्रिल 2026: कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता, वीज ग्राहकांना उन्हाळ्यात अखंडित सेवा मिळावी यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. ग्रीष्म ऋतूतील संभाव्य तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी महावितरणतर्फे बुधवारी, 8 एप्रिल रोजी शहरातील विविध विभागांमध्ये वीजवाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. या तातडीच्या कामासाठी नागपुरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सकाळी काही तासांसाठी बंद राहणार असून, ग्राहकांनी या काळात महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कॉग्रेसनगर विभागात कामाचे स्वरूप पाहता विविध गटांत वीज पुरवठा खंडित राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत नेल्को सोसायटी, सुमित नगर, अध्यापक लेआउट, आझाद हिंद नगर, टाकळी सिम पाण्याची टाकी परिसर आणि एलआयजी-एमआयजी कॉलनीमध्ये वीज नसेल. सकाळी ८ ते ११ दरम्यान जय बद्रीनाथ सोसायटी, राऊत वाडी, लोकसेवा नगर, मनीष लेआउट, गायत्री नगर, परसोडी आणि हनुमान मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. तसेच स्वावलंबी नगर, दिनदयाल नगर (सकाळी ८:३० ते १२) आणि जयप्रकाश नगर, सीता नगर, महालक्ष्मी मंदिर परिसर (सकाळी ८ ते १२) या भागातही देखभाल कार्य चालणार आहे. महाजन मार्केट आणि आयुर्वेदिक मार्केटमध्ये सकाळी ८ ते १०, तर इटरनिटी मॉल, व्हीआयपी रोड, काचीपुरा आणि सेंट्रल मॉल परिसरात सकाळी ७ ते १० या वेळेत वीज पुरवठा खंडित असेल.

महाल विभागांतर्गत ओंकार नगर, जयवंत नगर, साई नगर आणि गजानन नगर भागात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहील. अयोध्या नगर, उदय नगर चौक आणि साई मंदिर परिसरात सकाळी ७:३० ते १२:३० पर्यंत, तर मेडिकल चौक, रामबाग कॉलनी, जाटतरोडी आणि टी.बी. वार्ड परिसरात सकाळी ९ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत तांत्रिक कामे केली जातील. त्यामुळे या बागातील वीज पुरवठा खंडित राहील.

बुटीबोरी विभागातील काचीमेट, शांतीनगर आणि संत जगनाडे नगर भागात सकाळी ७ ते १२ वीज बंद असेल. एमआयडीसी उपकेंद्रातील औद्योगिक ग्राहकांसह रिलायन्स सिमेंट आणि ईशान कास्टींग यांसारख्या मोठ्या उद्योगांचा वीजपुरवठा सकाळी १० वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ग्राहकांना तांत्रिक बिघाडामुळे त्रास होऊ नये, यासाठी नवीन एबी स्विच बसवणे आणि ट्रान्सफॉर्मरची देखभाल करणे अनिवार्य आहे. या नियोजित कामामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर