Home Artical Blog चंद्रपूरजिल्ह्यातील भोंदू बाबांविरुद्ध महिलांचा एल्गार – कठोर कारवाईची मागणी

चंद्रपूरजिल्ह्यातील भोंदू बाबांविरुद्ध महिलांचा एल्गार – कठोर कारवाईची मागणी

0

चंद्रपूर(Chandrapur): चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या भोंदू बाबा, अनधिकृत ज्योतिषीय केंद्रे व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकलापांविरोधात आज आम्ही चंद्रपूरकर महिलांच्या वतीने ठोस पाऊल उचलण्यात आले.

जिल्ह्यातील महिलांची फसवणूक, मानसिक व आर्थिक शोषण तसेच अंधविश्वासाच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त करत, संघटनेच्या प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या माध्यमातून सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या भोंदूगिरी, खोटे चमत्कार, करणी-उतारा, वाईट शक्ती काढणे अशा नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून, “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, जादूटोणा व काळी जादू प्रतिबंधक कायदा, 2013” अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे नमूद करत, अशा प्रकारांवर तात्काळ आळा घालण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करणे, प्रत्येक पोलीस ठाण्यात हेल्पडेस्क सुरू करणे, तसेच जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आम्ही चंद्रपूरकर महिलांच्या वतीने गोमती पाचभाई,अ‍ॅड. मेघा भाले, अ‍ॅड. वैशाली टोंगे, शुभांगी आसुटकर, संघमित्रा खोब्रागडे, कविता आगलावे, नेत्रा इंगुलवार, समीक्षा नांदरकर,अ‍ॅड. प्रतीक्षा वाघमारे आदींची उपस्थिती होती.

या वेळी महिलांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “आमचा उद्देश कोणत्याही श्रद्धेला धक्का देणे नसून, अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीपासून समाजाचे, विशेषतः महिलांचे संरक्षण करणे हा आहे.”

महिलांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यात अंधश्रद्धेविरोधात एक ठोस जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.