नागपूर: शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार आहे. (ITI Student Stipend) विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात 40 रुपयांवरून 500 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील 418 आयटीआयच्या नुतनीकरणासाठी 1200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे. वाढत्या महागाईच्या काळात हे विद्यावेतन अतिशय कमी असल्याचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता.
राज्याचे कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन हे 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. आयटीआयमधील अभ्यासक्रम हे कालबाह्य झाले असून नवे अभ्यासक्रमांची पुढील वर्षी घोषणा करण्यात येणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत, त्या ठिकाणी आवश्यक असणारे अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.