कृषीमंत्री सत्तारांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप, राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

0

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूरः राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी आज विधानसभेत (Land Scam Allegations against Agriculture Minister Sattar ) केला. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आरोप केला की, सत्तार यांनी महसुल राज्यमंत्री असताना गायरान जमिन नियमबाह्य पद्धतीने खासगी व्यक्तीला दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सत्तार यांनी सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनीसाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही पवार यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावर मंत्र्यांकडून स्पष्टीकरण दिले जाईल तसेच काही बैकायदेशीर प्रकार घडला असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिले. मात्र, त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. या गोंधळातच विधेयकांसह महत्वाचे कामकाज तसेच लक्ष वेधी सूचना मांडल्या गेल्या.

विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गोंधळ कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाले. मात्र, गोंधळ कायम राहिल्याने ते दोन वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेतली. सत्तार यांचे नाव न घेता तत्कालीन महसूल राज्यमंत्री असा त्यांनी सत्तार यांचा उल्लेख केला. नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत, याकडे लक्ष वेधून पवार यांनी सांगितले की, “महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.”


यावेळी पवार यांनी सत्तार यांच्यावर सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही केला. कृषी विभागाला वेठीस धरण्यात आले. अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितले आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? याकरता मंत्री केले आहे का?,” अशी संतप्त विचारणाही पवार यांनी यावेळी केली.


अजित पवार इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सत्तार यांच्यावरील आधीच्या आरोपांचे मुद्देही मांडले. मागील सहा महिन्यात त्यांच्याबद्दल सतत काहीतरी घडत आहे. महिला नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला होता. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. त्या मंत्रिमंडळात तुम्हीही आहात. तुमच्या ११५ आमदारांमुळे हे मंत्री झाले आहेत. तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. तुमच्याकडे फार अपेक्षेने महाराष्ट्र पाहतो. तुम्ही ठरवलं तर राजीनामा घेऊ शकता, असेही ते बोलून गेले.


दरम्यान, या मुद्यावर भाष्य करताना कृषीमंत्री सभागृहात नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. ते या मुद्यावर स्पष्टीकरण देतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवाची शासनाने गंभीर दखल घेतली असून कुठे गैरप्रकार घडला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली. या गोंधळातच लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या. काही विधेयकही मांडण्यात आली. गोंधळ वाढत असताने विधानसभेचे कामकाज चारदा तहकूब झाले व दोन वाजता ते दिवसभरासाठी तहकूब झाले

विरोधकांचे विधानसभेत भजन, कीर्तन


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन विरोधी पक्षांचे सदस्य वेलमध्ये उतरले. तेथे त्यांनी ठाण मांडून सत्तार यांच्या विरोधात भजन आणि कीर्तनाच्या स्टाईलने घोषणाबाजी सुरु केली. राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… कुणी श्रीखंड घ्या, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून दिल्या जात होत्या.