
(Bhusaval)भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकावर दानापूर- पुणे एक्सप्रेसमधून मानवी तस्करी करुन 59 मुलांना नेण्याचा डाव रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी हाणून पाडला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावरून 30 मुलांची सुटका रेल्वे पोलिसांनी केली आहे. या सर्व मुलांचे वय 8 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. या मुलांची (Nashik) नाशिक व (Jalgaon)जळगाव येथील बाल रक्षक गृहात रवानगी करण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांच्या या कारवाईमुळे एकीकडे खळबळ उडाली असताना याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून एक तर मनमाड येथून चार संशयितांना अटक केली असून त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या चौकशीत सदर मुलांची मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वेद्वारे मानवी तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने या प्रकरणात सखोल चौकशी रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे. या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आवाहन रेल्वे पोलिसांसमोर आहे. याच प्रकरणातून मानवी तस्करीचे अजूनही काही धागेदोरे समोर येतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.