राम चालले तो तर सत्पथ !

0

राम चालले तो तर सत्पथ !

रामाची पावलं सभ्यतेचा प्रवास

पूजनीय श्रीराम पादुका

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात जनजागरणासाठी देशभर श्रीराम शीला पूजन, श्रीराम ज्योती यात्रा, शहीद कारसेवक अस्थीकलश पूजन असे विविध उपक्रम राबवले गेले. यात सर्व स्तरातील लोक अतिशय श्रद्धेने व आस्थेने सामील झाले. 1990च्या कारसेवेनंतर देशभर श्रीराम पादुका पूजनाचा उपक्रम राबवला गेला. देशाच्या विविध भागात अयोध्येहून श्रीराम पादुका पाठवल्या गेल्या. या प्रत्येक उपक्रमामागे आस्थे सोबतच भाव जागरण देखील महत्वाचे होते. अतिशय कल्पकतेने ही योजना आखण्यात आली होती.

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची पावलं ज्या ज्या भूमीत पडली तिथे अधर्माचा विनाश झाला. ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे, ‘राम चालले तो तर सत्पथ !’ रामाचा प्रवास हा एका सभ्यतेचा प्रवास होता. याच पावलांचे स्मरण श्रीराम पादुका पूजना द्वारे करण्यात आले.

रामायण ही भारतीय भावनांची भागीरथी आहे. श्रीरामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदासांनी आस्थापूर्वक श्रीरामांच्या पावलांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. श्रीरामाच्या पावलांवर ध्वज, वज्र, अंकुश, कमल आणि ऊर्ध्व रेखा असे पाच चिन्ह अंकित असल्याचे वर्णन गोस्वामीजींनी केले आहे. देशातील विविध रामायणात आलेले उल्लेख तपासले तर श्रीरामांच्या तळव्यांवर अठ्ठेचाळीस शुभ चिन्ह अंकित असल्याचे मानले जाते. उजव्या तळव्यावर चोवीस आणि डाव्या तळव्यावर चोवीस असे ते अठ्ठेचाळीस शुभचिन्ह होते.

या चिन्हांपैकी ध्वजा हे विजय व कीर्तीचे प्रतीक मानले गेले. वज्र या पदचिन्हामुळे शक्तीसामर्थ्याचा परिचय मिळतो. अंकुश म्हणजे दिव्यज्ञानाची प्राप्ती आणि मनावरचे नियंत्रण. कमळ हे चिन्ह प्रसन्न मनाचे व सदैव यश मिळण्याचे प्रतीक आहे. ऊर्ध्व रेखा जीवनाचा भवसागर पार करणारी ठरते. कल्याणाचे आणि मांगल्याचे प्रतीक स्वस्तिक आहे. या चिन्हांचे स्मरण, दर्शन आणि ध्यान लाभदायक ठरतात कारण ते श्रीरामांच्या पावलांवर अंकित आहेत, अशी श्रद्धा आहे.

श्रीरामाच्या उजव्या तळपावलावर अष्टकोन म्हणजे अष्ट सिद्धि. हल, मूसळ, सर्प (शेष), शर (बाण), अम्बर (वस्त्र), रथ, यव, कल्पवृक्ष, मुकुट, चक्र, सिंहासन, यमदंड, चामर, छत्र, नर (पुरुष), जयमाला हे सर्व पदचिह्न मंगल मानले गेले आहेत.

श्रीरामाच्या डाव्या पावलावर सरयू, गोपद, पृथ्वी, कलश, पताका, जम्बू फल, अर्धचंद्र, शंख, षट्कोण, त्रिकोण, गदा, जीवात्मा, बिंदु, शक्ति, सुधा कुंड, त्रिवली, मीन, पूर्ण चन्द्र, वीणा, वंशी (वेणु), धनुष, तूणीर, हंस आणि चंद्रिका हे सर्व पदचिन्ह मंगलमय मानले आहेत. या चिन्हांमुळे श्रीरामाच्या व्यक्तिमत्वातील सद्गुणांचे स्मरण होते.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात पूजनासाठी अयोध्येहून पाठवलेल्या श्रीराम पादुकांवर ही चिन्ह अंकित केली होती. बडनेरा परिसरासाठी पूजनास्तव आलेल्या श्रीराम पादुका आजही माझ्या घरी आमच्या देव्हाऱ्यात आहेत. रोज पूजा करताना त्या श्रीरामजन्मभूमीचे स्मरण करून देतात. शेवटच्या श्वासा पर्यन्त माझ्या आईने रोज नित्यनेमाने श्रीराम पादुकांची पूजा केली. आई नंतर पत्नीने ते व्रत स्वीकारले. गेली 33 वर्षे श्रीरामजन्मभूमी वर भव्य मंदिर निर्माणाच्या संकल्पाचे स्मरण त्या पादुका करून देत होत्या. श्रीराम मंदिर निर्मितीसाठी लक्षावधी घरात संकल्प केलेले होते. एका वृद्ध मातेने गेली 34 वर्षे मौन पाळले. अनेकांनी 1990च्या कारसेवेपासून पायात चप्पल घातलेली नाही. ज्यांना मुक्ती संग्रामात वीर मरण आले त्यांच्या माता – पित्यांचे अश्रू वाहणे कधीच थांबलेले नाही. अशा सर्व संकल्पांची सिद्धी आता 22 जानेवारीला होते आहे !

– शिवराय कुळकर्णी

9881717827