नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी रेल्वेसाठी विक्रमी 2.40 लाख कोटी रुपयांची (Railway budget 2023-24) तरतूद करताना रेल्वेच्या विकासासाठी नव्या १०० योजनांची घोषणा केली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वेसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद ही ९ पटीने अधिक असून रेल्वेत खासगी क्षेत्रांची भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात आलाय. रेल्वे अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासह नवी पायाभूत रचना विकसित करण्यावर भर दिला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रकल्प मानला जाणाऱ्या हाय-स्पीड ट्रेन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात नवे रेल्वे मार्ग तयार करणे, सेमी हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढविणे, हायड्रोजन संचालित गाड्यांसह अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करणे यावर भर देण्यात आलाय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाईल, अशी घोषणा केलीय. या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटीने जास्त वाटप असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रणालीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढ साध्य केली जात आहे.