24 गावांचा कर्नाटकात जाण्याचा ठराव

0

सोलापूर (Solapur)17 मार्च)कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने या गावातील ग्रामस्थ 24 गाड्या घेऊन बंगळुरूकडे रवाना होणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय.

गुरुवारी बंगळुरू येथे मुख्यमंत्री कार्यालयात या 24 गावातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीचा फटका सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवर होणार असून राज्यातही विरोधकांना प्रचारासाठी आयते कोलीत मिळणार आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर गेले अनेक वर्षे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील या 24 गावांनी थेट कर्नाटकाला जोडण्याची मागणी केल्यावर राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित होते. मात्र या 24 गावांनी ग्राम ठराव करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या गावातील प्रतिनिधींनी दोन बैठक घेतल्यावरही शासनाने यांच्या मागणीची दखल न घेतल्याने या गावांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिल्याने या 24 गावातून सर्व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ बंगळुरूकडे निघणार आहेत.