मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांबद्धल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची (Governor Bhagat Singh Koshyari) हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना दिला. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, असे पवार म्हणाले. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला. आम्ही महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हाती सत्तेची चावी आहे, ते महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असे पवार म्हणाले.
पवार म्हणाले, मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली. मी अनेक राज्यपाल मी पाहिले आहेत. तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावलौकिक वाढवण्याचे काम केले. मात्र, सध्याचे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच बिहार उत्तर प्रदेश, दक्षिणेत आदराने नाव घेतलं जाते आणि अशा महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर झाली पाहिजे. अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही, असे पवार म्हणाले. आजचा हा मोर्चा एका वेगळ्या परिस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले होते. अजूनही महाराष्ट्रात येण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव निपाणी कारवारमधील जनतेकडून सातत्याने महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले.