मविआचा हा ‘नॅनो मोर्चा’ : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा नॅनो मोर्चा होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी(DCM Devendra Fadnavis on MVA Morcha) आज केला.


महाविकास आघाडीच्या मोर्चासंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा नॅनो मोर्चा होता, असे सांगून फडणवीस म्हणाले की, कोणत्या तोंडाने हे मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. आज मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा काही हे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमाप्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. कारण, सीमाप्रश्न निर्माण करणारा काँग्रेस पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.


उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते आहे आणि ती गेल्या 10 वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी काही नवीन लोक नेमावे आणि त्यांनी त्यांना नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, कारण, भारताचे संविधान हे सर्वोच्च आहे. पण, त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत.
या मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन ‘ड्रोन शॉट’ दाखविता आले नाहीत, तुम्हाला ‘क्लोज शॉट’ दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या. पण, त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. आझाद मैदानाचा एक कोपराही त्यांना भरता आला नसता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी आणि पाकिस्तान एकाच दिवशी कसे बोलतात, हाच मला पडलेला प्रश्न पडला आहे. त्यांची राष्ट्राच्या प्रती संवेदना काय आहे, हे यातून लक्षात येते. पाकिस्तान तसे बोलले, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण त्यांना तर जगाने दहशतवादी राष्ट्र ठरविले. पण, राहुल गांधी असे विधान करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. चीनने जेव्हा-जेव्हा भारतीय भूभाग बळकावला, तेव्हा गांधी कुटुंब सत्तेत होते. आज देशात मोदीजींचे सरकार आहे. आज एक इंचही जमीन भारताची कुणाकडे जाऊ शकत नाही. आमच्या सैन्याने शूरपणे त्यांचा मुकाबला केला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा