मुंबई : राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on DCM Devendra Fadnavis) यांनी कारागृहातून बाहेर पडल्यावर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार काय? या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत यांनी उपरोक्त उत्तर दिले. राऊत यांनी फडणवीस यांचे कौतूक केल्याने राजकीय वर्तुळात काहीसे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी तुरुंगात असताना मला जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचे, तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरे देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते, ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. पण या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिलेत, असे ते म्हणाले. 103 दिवसांनी कारागृहाबाहेर आल्यावर राऊत यांनी प्रथमच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लक्ष्य केले. आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे म्हटले होते. मला त्यांना हेच सांगायचे आहे की मला ईडीने जी अटक केली ती बेकायदेशीर होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही असे चिंतू नये. मी एकांतात होतो, जसे सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला, असे ते म्हणाले.
सुडाचे राजकारण
काल न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिला त्यामुळे देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. मला ईडी किंवा अन्य कोणाविषयीही बोलायचे नाही. त्यांनी कारस्थान रचलं असेल, त्यामध्ये त्यांना आनंद मिळाला असेल तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्या मनात कोणाविषयीही तक्रार नाही. मी आणि माझ्या पक्षाने जे भोगायचं होतं, ते भोगलं आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावले आहे. पण मी या गोष्टींचा स्वीकार करतो, अशा गोष्टी आयुष्यात घडतात. पण आजपर्यंतच्या इतिहासात देशाने अशाप्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण कधी पाहिले नाही, असे ते म्हणाले. आज संजय राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट घेणार आहेत.