पंतप्रधान आवास योजनेच्या निविदांमध्ये घोटाळा, ईडीची संभाजीनगरमध्ये छापेमारी

0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस (Tender Fraud in PM Housing Scheme) आले आहे. या प्रकरणी ईडीकडून छत्रपती संभाजीनगरातील 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळीच ईडीकडून शहरात नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सव्‍‌र्हिसेस व जगवार ग्लोबल सव्‍‌र्हिसेस या तीन कंपन्यांनी महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘ रिंग’ केल्याचा ठपका ठेवणारी तक्रार प्रधानमंत्री आवास योजनेच्या महापालिकेतील प्रमुख उपायुक्त अपर्णा थिटे यांनी दिली. या तक्रारीनुसार महापालिकेने काढलेल्या निविदेतील अटींचे पालन न करता फसवणूक करण्याच्या उद्देशाने एकाच आयपीवरून निविदा भरल्या. तसेच आर्थिक क्षमता नसतानाही समरथ कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांची आर्थिक क्षमता लपवली. त्यामुळे महापालिकेची फसवणूक झाली आणि योजनाही रखडल्याची तक्रार थिटे यांनी केली. ही तक्रार गेल्या आठवठय़ात हे प्रकरण सक्त वसुली संचालनाकडे गेल्याच्या बातम्यानंतर दाखल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. समरथ कन्स्ट्रक्शन कंपनीस ही निविदा मंजूर करण्यात आली होती.
आता या प्रकरणी समरथ कन्स्ट्रक्शन कंपनीचे अमर अशोक बाफना, पूजा अमर बाफना, नीलेश वसंत शेंडे, अभिजित वसंत शेंडे, योगेश रमेश शेंडे, स्वप्नील शशिकांत शेंडे, हरिश मोहनलाल माहेश्वरी, सतीश भागचंद रुणवाल या आठ जणांवर तर इंडो ग्लोबल इन्फ्रास्र्टक्चरचे रितेश राजेंद्र कांकरिया, हितेश मनसुख करनावत, श्यामकांत जे वाणी, सुनील पी. नहार, प्रवीण भट्टड जगवार ग्लोबल सर्विसेसचे सुनील मिश्रीलाल, आनंद फुलचंद नहार, नितीन व्दारकादास न्याती, पियुष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती, मनोज अजॅन गुंजल अशा १९ जणांवर फसवणुकीसह विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पुढील तपास करणार आहेत.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा