मुंबई : राज्यातील महिलांना आज शुक्रवारपासून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीटांमध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार असून यासंबंधीचा आदेशही राज्य सरकारने काढला (50% Concession for women in State Transport Buses) आहे. राज्य अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत ही घोषणा केली होती. शुक्रवारी योजनेचा जीआर निघाला आहे. या सवलतीच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला देण्यात येते. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. त्याचप्रमाणे 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येते.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली होती. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीचा आदेश निघाला नव्हता. आता आजपासूनच या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.