पेशवे पदावर आलेल्या कणखर नेतृत्वांपैकी एक म्हणजे माधवराव. पानिपतानंतर मराठा साम्राज्य क्षीण झालेलं, समोर निजामासारखा प्रबळ शत्रू आणि रघुनाथरावांसारखे काका, अशा सर्वच प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत माधवराव पेशवेपदावर आले आणि त्यांनी मराठा साम्राज्य नुसते टिकवलेच नाही तर त्याचे गतवैभव परत मिळवून दिले.
माधवराव तसे सुरुवातीपासून पेशवे पदाचे दावेदार कधीच नव्हते. नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली पेशवेपदाचा कारभार सुरळीत चालला होता. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून विश्वासरावांसारखे सक्षम वारसदार होते. त्यांच्या दिमतीला सदाशिवरावभाऊ, गोपाळराव पटवर्धन आणि नाना फडणीसांसारखे कुशल लोक होते. त्यामुळे माधवराव हे पेशवे पदावर येतील अशी शक्यता फार कमी होती.
पण पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने या सर्व गोष्टींचे समीकरण बदलले. मराठा साम्राज्याचे अनेक उत्कृष्ट सेनानी या युद्धाने गमावलेच, पण पेशवे घराण्याचे वैयक्तिकरित्या फार मोठे नुकसान झाले. एक संपूर्ण पिढी पानिपताच्या युद्धाने गमावली. सदाशिवरावभाऊ, भावी पेशवे विश्वासराव या युद्धात धारातीर्थी पडले. या धक्क्याने आणि इतर अनेक गोष्टींमुळे नानासाहेब पेशवेही थोडक्याच काळात गेले.
आणि याच काळात अवघ्या १६ वर्षांचे माधवराव पेशवेपदावर आले. माधवरावांनी उत्कृष्ट राजकारण पटुत्व दाखवत कारभार हाकायला सुरुवात केली. पण रघुनाथरावांनी आपल्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे शक्य ते सर्व प्रयत्न करून माधवरावांना अडचणीत आणले. निझामानेही यासुमारास पुण्यात उच्छाद मांडला होता. १७६३ सालच्या राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांनी आपले युद्धकौशल्य वापरून निजामाचा पराभव केला. त्याच्याकडून खंडणी वसूल करून साम्राज्याची आर्थिक घडी बसवायला हातभार लावला. शिवाय हैदर अली सारख्या शत्रूला वठणीवर आणले.
वयाच्या २५ व्या वर्षी माधवरावांना राजयक्ष्मा झाला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी ०२ वर्षे राज्यकारभार समर्थपणे हाकला. अवघ्या २७ व्या वर्षी गजाननाच्या सान्निध्यात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. श्रीमंत माधवरावांनी आपल्या अल्पायुष्यात जी कामगिरी केली, त्यामुळे त्यांचा मराठा राजकारणात एक अमिट ठसा उमटला. म्हणुनच डफ सारखा परकीय इतिहासकार देखील माधवरावांबद्दल लिहितो,
“And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent Prince..”
या कर्तृत्ववान पेशव्याच्या अकाली जाण्याने झालेल्या हानिपुढे पानिपतच्या युद्धात झालेली हानीदेखील काहीच नाही.”
संदर्भ – १. पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
२. मराठ्यांची बखर – ग्रँट डफ
३. मराठी रियासत खंड ५ – सरदेसाई