गाडीवर दगडफेक; माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी

0

नरखेड : महाराष्ट्रात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज ते प्रचार अशी रणधुमाळी सुरु होती. अखेर आज त्याची सांगता सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी मतदारसंघात जोरात प्रचार केला. अशातच कोटोल मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांना जखमी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख निवडणूक लढवत नसून त्यांच्याजागी पुत्र सलील देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनिल देशमुखांनी काटोल-नरखेडमध्ये जाऊन सालीलच्या विजयासाठी प्रचार केला. नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. त्याचवेळी काटोल-जलालखेडा रोडवरील बेल फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.