मुंबई : शिवसेना-शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ( SIT Probe on Sheetal Mhatre Video) यांच्या व्हायरल झालेल्या कथित मॉर्फ व्हिडीओ प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत
केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथक ही चौकशी करणार आहे. शिवसेना-शिंदे गट आणि भाजपकडून जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन दहिसर परिसरात करण्यात आले होते. त्या दरम्यान एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच रॅलीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे दिसत आहेत. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप करीत आपली बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. यामागे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याची तक्रारही त्यांनी दहीसर पोलिसांकडे केली आहे. आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती.
दरम्यान, या घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विधिमंडळ अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हायरल व्हिडीओचा आरोप ठाकरे यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी असल्याचा आरोप करण्यात आला. विधानसभेत या प्रकरणी झालेल्या चर्चेला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना एसआयटी चौकशीची घोषणा केली.
ठाकरे गटाचे पदाधिकारी अटकेत
दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी पोलीस तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे युवा सेना कोअर टीमचे सदस्य साईनाथ दुर्गे आणि ‘मातोश्री’ फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.