तर बांबूला चांगले दिवस येतील – डॉ. नीलम मंजुनाथ

0

बांबूच्‍या क्षेत्रात अनेकजण उत्‍तम काम करीत आहेत. त्‍या सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर निश्चितपणे पुढील दहा वर्षात बांबूला चांगले दिवस येतील, असे मत आर्किटेक्‍ट डॉ. नीलम मंजुनाथ यांनी व्‍यक्‍त केले.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्‍ट्र चॅप्‍टर, विदर्भ रिजनच्‍यावतीने ‘बांबू – इट्स डिझाईन अॅप्‍लीकेशन’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. व्‍हीएनआयटीच्‍या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्‍या या कार्यक्रमात त्‍यात प्रमुख वक्‍ता म्‍हणून बोलत होत्‍या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कोराडी थर्मल पॉवर स्‍टेशनचे मुख्‍य अभियंता विलास मोटगरे, व्‍हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, महाराष्‍ट्र बांबू विकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. श्रीनिवास राव, महाराष्‍ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबईचे सीईओ व्‍ही ग‍िरीराज, बीएआय विदर्भ रिजनचे अध्‍यक्ष अजय पाटील,संयोजक आर्किटेक्‍ट महेश मोखा यांची उपस्‍थ‍िती होती.
डॉ. नीलम मंजुनाथ यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्‍या माध्‍यमातून ‘लेट्स बिल्‍ड विथ बांबू’ या विषयावर त्‍यांनी देशभरात बांबूच्‍या मदतीने केलेल्‍या विविध प्रकल्‍पाची माहिती दिली. देशविदेशात बांबूचा उपयोग घर, छत, इंटेरियर, छोटे पूल आदींसाठी कसा केला जात आहे, याबद्दल सांग‍ितले. त्‍या म्‍हणाल्‍या, बांबू हा लवचिक, भूकंप प्रतिरोधक, वजनाने कमी, स्‍वस्‍त आणि नैसर्गिकरित्‍या कठीण असतो. त्‍यावर अति प्रक्रिया करून त्‍याची गुणवत्‍ता कमी केली जात असल्‍याबद्दल त्‍यांनी खंत व्‍यक्‍त केली. भविष्‍यात बांबूची गावे तयार करण्‍याचा मानसही त्‍यांनी यावेळी बोलून दाखवला.

डॉ. श्रीनिवास राव यांनी बांबूपासून विविध प्रकारचे स्‍ट्रक्‍चर व उत्‍पादने तयार करण्‍यासाठी संशोधनाची गरज असल्‍यावर भर दिला. डिझायनरकडून चांगली उत्‍पादने डिझाईन करवून घेणे, कारागीरांना प्रशिक्षण देणे, हार्वेस्‍टींगचे प्रशिक्षण आदीची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले. व्‍ही. ग‍िरीराज यांनी बांबूची इकोसिस्‍टीम विकसीत करण्‍यासाठी फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. बांबू विकासासाठी एन्‍व्‍हायरमेंट, एम्‍प्‍लायमेंट, इक्‍वीटी आणि इकॉनॉमिक्‍स या चार बाबींचे महत्‍त्‍व त्‍यांनी पटवून दिले.

डॉ. प्रमोद पडोळे यांनी व्‍हीएनआयटीमध्‍ये बांबूक्षेत्रातील विविध अभ्‍यासक्रमांची माहिती दिली तर विलास मोटगरे कोराडी थर्मल पॉवर प्‍लँटमुळे होत असलेल्‍या प्रदूषणाला आळा घालण्‍यासाठी 52 एकर जागेवर 13 महिला बचत गटांच्‍या मदतीने 52 हजार बांबूची झाडे लावण्‍यात आल्‍याचे सांग‍ितले. डॉ. प्रशांत बोकारे यांनी कॉन्‍क्रीटचा उत्‍तम पर्याय म्‍हणून बांबू वापराला जाऊ शकतो असे सांग‍ितले.

महेश मोखा यांनी व्‍हीएनआयटीसारखेच गोंडवाना विद्यापीठानेही बांबूशी संबंधित विविध अभ्‍यासक्रम सुरू करावे, असे आवाहन केले तर अजय पाटील यांनी या परिसंवादातील तज्ञांच्‍या मार्गदर्शनाचा व्‍हीएनआयटीच्‍या विद्यार्थ्‍यांना लाभ होत असल्‍याचे सांग‍ितले. सूत्रसंचालन सुरक्षा हिने केले तर आभार प्रो. उदय गडकरी यांनी मानले. दिवसभर चाललेल्‍या विविध सत्रांमध्‍ये तज्ञांनी केस स्‍टडी सादरीकरण, तांत्रिक सादरीकरण, पॅनेल डिस्‍कशन पार पडले. समारोपीय सत्रात व्‍ही. ग‍िरीराज यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले.