तर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम, शेतकऱ्यांचा इशारा

0

 

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, 10 दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर भव्य चक्काजाम आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत. शेतकरी शेतामध्ये खरीप व उन्हाळी हंगामामध्ये धान पिकाची लागवड करतात. पिकांना सिंचनासाठी कृषी वीज पंपाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा केला जात असल्याने रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतशिवारात प्रवास करावा लागत आहे. शेतशिवारात सिंचनासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा 12 तास वीजपुरवठा करण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथून मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी 28 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाला बहुसंख्य सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शवित, शासनाला मागणी पूर्ण करण्याची विनंती केली. आंदोलनाची प्रचिती पाहून महावितरणचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांनी आंदोलनस्थळी भेट देत, दहा दिवसांत शासन आदेश करण्याचे तोंडी आश्वासन दिले. आश्वासनावरून शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, दहा दिवसांत आदेश मिळाले नाही तर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.