सोनाली फोगाट यांना सातवेळा जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले, सीबीआयचा आरोपपत्रात खुलासा

0

नवी दिल्ली : टिकटॉक स्टार अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून त्यात सीबीआयने अनेक धक्कादायक बाबी मांडल्या आहेत. फोगाट यांना एमडीएमए हे ड्रग्ज जबरदस्तीने देण्यात आले व ते एकदा नव्हे तर तब्बल सातवेळा ते त्यांना जबरदस्तीने देण्यात आल्याचे ( Sonali Phogat Case) सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे. सोनाली फोगट, सुधीर सांगवान आणि सुखविंदर हे तिघेही कर्लीज क्लबवर होते व २२ ऑगस्टच्या रात्री दोघांनी अर्धा तासातच तब्बल सातवेळा त्यांना जबरदस्तीने ड्रग्ज प्यायला दिले, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने यासंदर्भातील व्हीडिओचा तपास करून ड्रग्ज देण्याच्या वेळाही आरोपपत्रात नमूद केल्या आहेत.


सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी सुधीर सांगवान, सुखविंदर सिंह, कर्लीज हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने कर्लीज क्लबमधील वेटर सरधन दास याला याप्रकरणाचा साक्षीदार केले आहे. वेटर सरधन दास याने यासंदर्भात सविस्तर माहिती सीबीआय ला दिली आहे. त्याने सांगितले की, 22 ऑगस्ट रोजी मी रात्रीच्या शिफ्टला होतो व माझी ड्युटी पहिल्या मजल्यावर होती. त्यावेळी सोनाली सुधीरसोबत डान्स करत असल्याचे आपण पाहिले. या दरम्यान सुधीर आणि सुखविंदर हे दोघेही तिला ड्रग्ज पिण्यास भाग पाडत होते. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात 104 जणांची साक्षीदार म्हणून नोंद केली आहे.


हत्येचे गूढ कायम


सोनाली फोगटच्या हत्येमागील कारण काय होते, हे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. सोनालीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सुधीर आणि सुखविंदरला आरोपी बनवले असले तरी या दोघांनीदेखील सोनालीची हत्या कोणत्या उद्देशाने केली, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, ड्रग्जमुळेच सोनाली यांची प्रकृती बिघडली होती. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. यानंतर त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले होते, असे सीबीआयने नमूद केले आहे.