एसटी कामगारांचे आता नागपुरात आमरण उपोषण

0

पडळकर, खोतही होणार सहभागी


नागपूर. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची (Uddhav Thackeray government) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोंडी झाली होती. त्यावेळी मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत राहिले. तिथूनच आंदोलन चिघळले आणि तोडगाही निघाला. आता एसटी पूर्वपदावर आली असतानाच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत (BJP MLA Gopichand Padalkar and Sadabhau Khot) यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान (Nagpur Winter Session) २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे पडळकर, खोत यांच्या संघटनेचाही शिंदे फडणवीस सरकारविरोधात संघर्ष अटळ दिसत आहे.संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष रवींद्र अढाऊ यांनी ७ डिसेंबरला नागपुरातील जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त या तिन्ही कार्यालयांना रितसर पत्र देऊन या आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे.
गत संप व आंदोलनाच्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या १६ मागण्यांवर चर्चा होऊन त्या मान्य करण्याचे मान्य झाले. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी सरकारने उचलली आहे. दर महिऩ्याच्या नियोजित वेळेत वेतन देण्याची अटही सरकारने मान्य केली होती. त्यानंतरच कामगार सेवेत परतले होते. निर्वाणिचे आंदोलन या निर्धाराने कर्मचाऱ्यांनी लढा दिला होता. सरकारने त्यावेळी अटी शर्थी मान्य केल्या. मात्र, अद्याप मागण्याची पूर्तता मात्र केली नाही.
सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी शासनाकडे अनेकवेळा या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. परंतु, पुढे काहीच होत नाही. त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवाणगी मागण्यात आली आहे.
राज्यात सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारला स्थिर व्हायला आवश्यक अवधी दिल्यावरही सरकारने एसटीच्या प्रश्नांवर एकदाही चर्चेला बोलावले नाही. सध्या सरकार उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंतांच्या इंडियात दिसत आहे. त्यांनी बाहेर पडून सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या भारतात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवे. एसटीतील भ्रष्टाचार संपवायला हवा. मागण्या मान्य न केल्यास पुढे आंदोलन तीव्र केले जाईल, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा