नागपूर : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा त्यांना नागपुरात प्रदान केला जाणार आहे. राज्याचा हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो (Asha Bhosle to get Maharashtra Bhushan in Nagpur). हा पुरस्कार २०२० मध्येच जाहीर झाला असला तरी कोरोनाच्या संकटामुळे पुरस्कार प्रदान करण्याचे कार्यक्रम आयोजित करता आलेले नव्हते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने देखील हा विषय मागे पडला होता. आता हा पुरस्कार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात प्रदान करण्याचे ठरत आहे. नागपुरात बहाल करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ‘आवाज चांदण्यांचे’ या थीमवर संगीत रजनी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात २०२० सालच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी गायिका आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यक्रमांच्या आयोजनांचे प्रमाण वाढले आहे. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गानकोकिळा लता मंगेशकर व क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना नागपुरातील विधानभवनच्या हिरळीवर एका शानदार सोहळ्यात ‘महाराष्ट्र भूषण’ने गौरवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पहिल्यांदाच हा सोहळा मुंबई बाहेर झाला होता. आता अडीच दशकानंतर पुन्हा असा सोहळा नागपुरात घेण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र भूषणसह इतर सांस्कृतिक पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून प्रदान करण्यात आलेले नाहीत. जाहीर कार्यक्रम आयोजित करून सर्व पुरस्कार एकाचवेळी प्रदान करण्याचे सांस्कृतिक विभागाचे प्रयत्न आहेत. नागपूरमध्ये पुरस्कार स्वीकारण्यास आशा भोसले यांनी सहमती दिली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अधिवेशन काळात हा सोहळा आयोजित करण्याचे नियोजन आहे.