नागपुरात सोमवारी प्रदेश भाजपची बैठक, संघटनात्मक मुद्यांवर होणार चर्चा

0

मुंबईः उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक १९ डिसेंबर रोजी नागपूर (BJP State Meeting in Nagpur) येथे होणार आहे. बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
केंद्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी हे उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे उदघाटन होणार आहे. पक्षाचे सर्व प्रमुख प्रदेश पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर होणाऱ्या विविध सत्रांमध्ये विद्यमान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. पक्षाच्या संघटनेकडून राज्यात राबविल्या जाणाऱ्या धन्यवाद मोदीजी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, नव मतदार नोंदणी या सारख्या वेगवेगळया अभियानाबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने बैठकीचा समारोप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.