राज्यातील 7751 ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू

0

नागपूर जिल्ह्यात 234 ग्रामपंचायतीसाठी प्रक्रिया ; दोन ग्रापं अविरोध, 5632उमेदवार रिंगणात


नागपूर. नागपूर जिल्ह्यासह राज्यातील 340 तालुक्यातील 7751 ग्रामपंयातीसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदांसाठी मतदान (Voting for Gram Panchayats ) सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात (Nagpur district ) 234 ग्रामपंचायतीसाठी मतदान होते आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Reputation of political giants at stake ) लागली आहे़ एकूण दोन हजार 268 रिक्त जागांसाठी 5632 उमेदवार रिंगणात आहे. या सर्वांच्या भाग्याचा फैसला मंगळवार, 20 डिसेंबरला ईव्हीएममधून होणार आहे. दरम्यान, नरखेड तालुक्यातील अंबाडा व नागपूर ग्रामीण तालुक्यातील माहुरझरी ग्रामपंचायत अविरोध झाली. या निवडणुकीत तीन माजी मंत्री व एका प्रदेशाध्यक्षांसह आजी-माजी आमदारांच्या राजकीय अनुभवाची ही खरी परीक्षा राहणार आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती सावनेर तालुक्यातील आहे़ एकूण 820 प्रभागांत सदस्यपदाच्या दोन हजार 34 जागा रिक्त आहे़ यासाठी 4883उमेदवार मैदानात आहे़ 234 सरपंचपदासाठी 749 उमेदवारांनी गावाचा प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली. या निवडणुकीसाठी दोन लाख आठ हजार 826 महिला मतदार व दोन लाख 18 हजार 660 पुरुष मतदार, असे एकूण चार लाख 27 हजार 449 मतदार मतदानाचा हक्क बजावितील.
नागपूर जिल्ह्यात एकून 903 मतदान केंद्रांवर 910 ईव्हीएम मशीन मतदानासाठी लावण्यात आल्या आहेत. याशिवाय, एक हजार 349 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा, सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी एक हजार 523 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ सकाळी 7 वाजतापासून मतदानास सुरूवात झाली असून. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान चालेल.

राजकिय प्रतिष्ठा


ग्रामपंचायतीच्या निवडणूका छोटया असल्या तरी नेत्यांची राजकिय प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या आहेत. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन नागपुरात असल्याने या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा असल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागून आहे. तर, माजी मंत्री सुनील केदार, तुरूंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातही निवडणूका असल्याने त्याकडे नजरा असतील. याशिवाय, त्या त्या विधानसभा क्षेत्राचे आमदार व स्थानिक नेत्यांचेही राजकिय भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे.

निवडणूक बसने तिघांना उडविले


खापरखेडयांतर्गत येणाऱ्या भानेगाव, चिचोली ग्रामंपचायत निवडणूकीसाठी कर्मचारी व साहित्य घेऊन जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीवरील दोघांना उडविले. यात दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी दुपारी 2.48 वाजता ही घटना घडली. चालक प्रकाश ठाकरे एमएच-12 ईएफ 6974 क्रामांकाच्या बसमधून निवडणुकीचे साहित्य आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जात होते. वाटेत कामठीच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला या बसने धडक दिली. यात आवेश अंसारी ( 14), महिन अंसारी आणि आणखी एक असे तिघे जखमी झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अपघातानंतर नागरिकांनी धावपळ करीत जखमींना उपचारासाठी हलविले. याप्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.