
(Union Minister Shri. Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला उसळली गर्दी
(Nagpur)नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला दिव्यांग, ज्येष्ठ, तरुणांसह विविध संस्था, संघटनांच्या सदस्यांनी गर्दी केली. मंत्री महोदयांना भेटून निवेदने देतानाच लोकोपयोगी साहित्याची मागणी देखील करण्यात आली.
ना. श्री. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटता येणार म्हणून खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची गर्दी उसळली. कुणी संजय गांधी निराधार योजनेसाठी, तर कुणी रस्त्याच्या कामांसाठी, कुणी नोकऱ्यांसाठी तर कुणी नावीन्यपूर्ण प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यासाठी मंत्री महोदयांची भेट घेतली. गर्दीतील प्रत्येकाला व्यक्त व्हायचे होते. काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती, तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने ना. श्री. गडकरी यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले,’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. वैयक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत विविध प्रकारच्या विषयांसाठी यावेळी निवेदने देण्यात आली. ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. यावेळी अयोध्या यात्रेवर निघालेल्या सनातन रक्षक सेनेच्या वाहनाला ना. श्री. गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.
इलेक्ट्रिक स्कुटरचे स्टार्टअप
तामिळनाडू येथील कोईंबतूर शहरातील कार्तिकेय विश्वकर्मा या तरुणाने इलेक्ट्रिक स्कुटरचे स्टार्टअप सुरू केले आहे. ट्रायडन टेक नावाने त्याने कंपनी सुरू केली असून किक स्कुटर्स, इलेक्ट्रिक व्हेइकल, इलेक्ट्रिक बोट आदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी देखील त्याअंतर्गत तयार होतात. या तरुणांनी आज ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन इलेक्ट्रिक स्कुटरचे प्रात्यक्षिक दाखविले. मंत्री महोदयांनी या तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
भजन मंडळांना निःशुल्क साहित्य वाटप
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या वतीने नागपुरातील विविध भजन मंडळांना निःशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये टाळ, तबला आणि हार्मोनियमचा समावेश आहे. सार्वजनिक हनुमान मंदिर, जय माँ दुर्गा महिला मंडळ, ओंकारेश्वर महिला भजन मंडळ, भवानी माता भजन मंडळ, पुष्पांजली भजन मंडळ, कृष्णाई भजन मंडळ आदी मंडळांना वाटप करण्यात आले. नागपुरात खासदार भजन स्पर्धेच्या निमित्ताने अतिशय उत्तम उपक्रम आयोजित केल्याबद्दल भजन मंडळांनी ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार मानले.