नवी दिल्लीः शिवसेना पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून इतरत्र वळविण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेच्या पक्षनिधीच्या वापरावर स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका आशीष गिरी या वकीलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलीय. आपण कोणत्याही गटाचे कार्यकर्ते नसून एक नागरिक म्हणून ही याचिका केल्याचे त्यांनी स्पष्ट केले (Petition in SC on Shiv Sena Party Fund). शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा व मालमत्ता गोठवण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी या याचिकेवरही सुनावणी घ्यावी, अशी मागणी अॅड. गिरी यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर आमचा कोणताही दावा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाकडून शिवसेनेचा पक्ष निधी इतरत्र वळविण्याची शक्यता काही प्रसार माध्यमांनी व्यक्त केली आहे. हा निधी इतरत्र जाऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रिसिव्हर नियुक्त करून ही मालमत्ता ताब्यात घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेना नेमकी कोणाची, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर ही संपत्ती संबंधित गटाकडे सोपवावी, असेही गिरी यांनी नमूद केले आहे. केवळ पक्षनिधीच नव्हे तर शिवसेना भवन व शिवसेनेच्या शाखांच्या वापरावरही स्थगिती आणावी व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर शिवसेनेच्या अध्यक्षांकडे सर्व पक्षनिधी व मालमत्ता वर्ग करावे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.