सुजय विखे पाटलांनी
पाजळलेली अक्कल!
राज्याचे एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे, बापाच्या भरवशावर नावलौकिक आणि फेम मिळालेले दिवटे चिरंजीव सुजय विखे पाटील, नको ते बरळून गेले. म्हणाले, शीर्डीच्या साई मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून चालवले जाणारे अन्नछत्र बंद करायला हवे. फुकटचे मिळते म्हणून राज्य भरातले भिकारी इथे शीर्डीत जमा होऊ लागले आहेत…
आजोबा आणि वडिलांच्या दिमतीवर मोठेपण वाट्याला आले असल्याने अन्नछत्राची रचना आणि गरज कदाचित सुजय पाटील यांच्या अद्याप लक्षात आली नसावी. मुळात, धर्मशाळा, अन्नछत्र, या समाजातील आहे रे वर्गाने नाही रे वर्गाची आवश्यकता लक्षात घेऊन उभारलेल्या व्यवस्था आहेत. शिवाय, प्रार्थनास्थळ व्यवस्थापनांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अशा व्यवस्थांना तर धार्मिक आणि भावनिक आयामही जोडला जातो. त्यातून एक सामाजिक कर्तव्य पार पडते ते वेगळेच. कारण, एकदा मंदिर, गुरुद्वाराशी त्याचा संबंध जुळला की अन्नछत्रातील जेवण फक्त जेवण राहातं नाही. त्याला प्रसादाचा अर्थ आणि व्याप्ती लाभते. गुरुद्वारातील लंगर असो वा मग मंदिरातील महाप्रसाद, वाढणारे अन् स्वीकारणारे सारे एका रांगेत येताना. कोणीच दाता आणि कोणीच भिकारी राहात नाही. म्हणूनच भिकाऱ्याच्या बाजूला बसून तो स्वीकारण्यात गर्भश्रीमंत माणसालाही कमीपणा वाटत नाही. पण, अन्नछत्रात भोजन करणारे सारे भिकारी असतात, हा सुजय पाटील यांच्या डोक्यात आलेला विचार कदाचित, सामाजिक जबाबदारीच्या भानाच्या अभावातून आला असेल, पण आधुनिकतेत्या पार्श्वभूमीवरही त्याचे समर्थन होऊ शकत नाही.
मुळात, समाजात अभावात असूच नये. सारी माणसं संपन्न असावीत. कुणालाच खाण्यापिण्याची ददात पडू नये. उपाशी राहण्याची वेळ तर कुणालाच येऊ नये…पण हा कल्पनाविलास झाला. ती वस्तुस्थिती नाही. आज जगाच्या पाठीवर कितीतरी लोक उपाशी वा अर्धपोटी झोपतात, हा युनो चा अहवाल एकदा नजरेखालून घातला असता तर सुजय पाटील असे बरळले नसते. पण बापजाद्यांच्या कमाईवर
बंगल्यात आयुष्य घालत, त्याच भरवशावर समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या पाटलांना या वास्तवाचे भान राहिले नसेल, तर हरकत नाही. पण, निदान असली बेताल बडबड करून नसलेली अक्कल पाजळताना त्यांनी जरा तरी विचार करायला हवा होता ना! तसे केले असते तर, शीर्डीतल्या या प्रसादालयात प्रसाद ग्रहण करायला फक्त भिकारीच येत नाहीत, हे त्यांना कळले असते. त्यामुळे सुजय विखे पाटलांचे एकूण विधान, इथे भगवंताच्या दर्शनाच्या अभिलाषेने येणाऱ्या आणि आलो आहोतच म्हणून महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या तमाम भाविकांचा अपमान करणारे आहे. पूर्वी राजे, राजवाड्यांच्या माध्यमातून अशी व्यवस्था होत असे. राजेशाही संपल्यावर समाजातील विविध घटक आपापल्या परीने या व्यवस्था उभारीत. गावात आलेल्या अनोळखी माणसालाही पाण्यासोबत गुळाचा खडा देणारी रीत, हा त्याचाच परिपाक आहे. आज अनेकानेक मंदिरात, भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था होते. अमरनाथ, गाणगापूर अशा ठिकाणी तर लोक आपापल्या स्तरावर भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करतात. भाविकांसाठी आग्रहाने बोलावून, भोजन करण्यास निमंत्रित करतात…शीर्डी देवस्थानाने उभारलेली महाप्रसादाची व्यवस्था हा काही अपवाद नाही किंवा नवलाई देखील नाही. कित्येक छोट्या शहरांमधील गुरुद्वारात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असल्याने, वाया जाऊ नये म्हणून तयार करून ठेवत नसले, तरी येणाऱ्या भाविकांना लंगर साठी आग्रह करण्याची आणि स्वयंपाक वेळेवर तयार करून जेवू घालण्याची प्रथा आहे. सुजय पाटील तर या प्रथेवरच घाला घालायला निघाले आहेत. अन्नछत्रात कोणी यावे, यावर बंधनं नसतात. त्यामुळे भिकारीही तिथे भोजनाच लाभ घेत असतील, मंदिरात येणारे भाविक दान देतात म्हणून मागणाऱ्यांची संख्या वाढली असेल, तर
समाजात, भिकाऱ्याची वाढलेली संख्या हा चिंतेचा विषय व्हावा. इथेच काय किंवा जगात काय, भिकारी, दारिद्रय, गरीब-श्रीमंतांमधील वाढती दरी, आदी बाबींवर विचार व्हावा. त्यावरील उपाययोजना हा जागतिक पातळीवर योजण्याचा मुद्दा आहे. कारण ही एकट्या भारताची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे. भारत सरकारच्या स्तरावरही देशातली गरीबी संपवण्यासाठी गांभीर्याने काम व्हावे. पण सुजय पाटील तर, समस्येच्या मुळाशी जायचं सोप्पा सोडून, सोप्पा उपाय शोधायला निघालेत. दिल्लीत कुठलेही आंतरराष्ट्रीय सम्मेलन होणार असले की पहिली गाज पडते ती तिथल्या भिकाऱ्यांना. सर्वात आधी त्यांना शहराबाहेर काढले जाते….म्हणजे, आमच्याकडे भिकारी नाहीत, हे ‘दाखवायला’ सोपे. हा भिकारी अन् गरीबी संपवण्याचा उपाय आहे का? इथेही, गावात भिकारी येतात म्हणून शीर्डीतले अन्नछत्र बंद करणे, हा कुठला न्याय झाला? सुजय पाटील सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणात असतील तर असल्या वरवरच्या उपायांनी मूळ समस्या सुटत नसते, हे त्यांना कोणीतरी सांगावे…